नवनितानंद महाराजांच्या अपघाती निधनाने अध्यात्मिक क्षेत्रात हानी
By सचिन सागरे | Published: December 20, 2022 06:19 PM2022-12-20T18:19:12+5:302022-12-20T18:19:33+5:30
पश्चिमेतील फोरेस्ट कॉलनी परिसरात श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना मोडक महाराजांनी केली आहे.
कल्याण - कल्याणसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे मठाधिपती नवनितानंद महाराज (अरुण मोडक) यांच्या सोमवारी सकाळी सातारा येथे झालेल्या अपघाती निधनाने अध्यात्मिक क्षेत्रात मोठी हानी झाली. मंगळवारी सकाळी मोडक महाराजांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी मठामध्ये ठेवण्यात आले होते. सोमवारी रात्रीपासूनच भक्तगण याठिकाणी जमा झाले होते. महाराजांच्या इच्छेनुसार मंगळवारी मठाच्या आवारात त्यांना मरणोत्तर समाधी देण्यात आली.
पश्चिमेतील फोरेस्ट कॉलनी परिसरात श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना मोडक महाराजांनी केली आहे. त्याचबरोबर, मुंबई, रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना करत हजारो भक्तांना अध्यात्मिक प्रवाहात आणण्यासाठी मोठे योगदान दिले. नामस्मरण, सेवाभाव, कुलाचार याद्वारे ईश्वरसेवा करत आपले संस्कार आणि संस्कृती जोपासून आध्यात्मिक प्रगतीच्या त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आज हजारो भक्तगण वाटचाल करत आहेत.
कल्याण येथील मठात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मोडक महाराज कार्यरत होते. भक्ती, प्रेम, त्याग, शिस्त आदी गुणांचा संगम म्हणून भक्तगणांच्या हृदयात त्यांचे अढळ स्थान होते. मोडक महाराजांच्या अशा अकाली अपघाती निधनाने भक्तगणांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.