बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला दोन दिवसाची पोलिस कोठडी
By मुरलीधर भवार | Published: September 3, 2024 08:12 PM2024-09-03T20:12:34+5:302024-09-03T20:13:02+5:30
न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कल्याण- बदलापूरमधील शिशू वर्गात शिकणाऱ्या दोन लहान मुलींवरील लैगिंक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज पुन्हा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बदलापूर प्रकरणातील पिडीत मुलींवर झालेल्या लैगिंक अत्याचार प्रकरणात शाळेसमोर आणि रेल्वे स्थानकात मोठे आंदोलन करण्यात आले. आराेपी अक्षय शिंदेला अटक करुन फाशी देण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याला अटक करुन कल्याण जिल्हा सत्र न्यायालयासमोरील पोक्सा विशेष न्यायालयासमोर हजर केले होते. त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी होती. त्यानंतर त्याला पुन्हा २६ ऑगस्ट रोजी हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली. दोन पिडीत मुलीपैकी एकाच मुलीवरील अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या पिडीत मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यावर आरोपी अक्षय शिंदे याला पुन्हा कल्याण न्यायालयात हजर केले गेले. त्याला न्यायालयाने दुसऱ्या मुलीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर त्याची कल्याण न्यायालयात ओळख परेड घेण्यात आली. पिडीत मुलीने आरोपी अक्षय शिंदे याला ओळखले हाेते. हाच तो काठीवाला दादा अशी पीडित मुलीने अक्षयची ओळख सांगितली होती.
तपास पथकाने आरोपी अक्षय शिंदे याला दुसऱ्यांदा कल्याण न्यायालयात हजर केले होते. तेव्हा तपास कामी पोलिस कोठडी मागण्याचा अधिकार राखून ठेवला होता. आरोपी अक्षय शिंदे यांची ओळख परेड झाली असली तरी त्याचा मोबाईल अद्याप हस्तगत करण्यात आलेला नाही. मोबाईल हस्तगत करुन त्याने अन्य मुलींसोबत हा प्रकार केला आहे की नाही ? हे तपासण्याकरीता आरोपी अक्षय शिंदे याला पुन्हा कल्याण न्यायालयातील जिल्हा सत्र न्यायाधीश पी. पी. मुळे यांच्या समोर हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिल अश्वीनी भामरे पाटील यांनी आरोपीला तपास कामी ५ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.