अमूदान स्फोट प्रकरणातील आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
By मुरलीधर भवार | Published: May 29, 2024 06:38 PM2024-05-29T18:38:46+5:302024-05-29T18:39:11+5:30
आज कल्याण न्यायालयात या दोघांना हजर केले असता त्या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली एमआयडीसीतील अमूदान कंपनीतील स्फोट प्रकरणी कंपनी मालक मलय मेहता आणि त्याची पत्नी स्नेहा मेहता या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. आज कल्याणन्यायालयात या दोघांना हजर केले असता त्या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अमूदान कंपनी स्फोट आणि त्यामुळे लागलेल्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ६५ जण जखमी झाले आहे. त्याचबराेबर अमूदान कंपनीसह शेजारच्या सात कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोट झाल्याच्या दुसऱ््याच दिवशी कंपनी मालक मलय मेहता याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला यापूर्वीच कल्याण न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मलय मेहता याची पोलिस कोठडी संपण्यापूर्वीच एक दिवस आधी काल मलय याची पत्नी स्नेहा हिला उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
मलयसह त्याची पत्नी स्नेहा हिला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मलय आणि स्नेला या दोघांना दोन दिवसांची पाेलिस कोठडी सुनावली आहे. मलय याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ झाली आहे. तर स्नेहाला प्रथमच दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. दोघांनाही पुन्हा ३१ मे रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे.
कंपनी मालक कंपनी कोणत्या प्रकारचे उत्पादन घेत होते. त्यासाठी कच्चा माल कुठून आणत होते. कच्च्या मालावर प्रक्रिया करुन झाल्यावर तयार झालेला पक्का माल कोणाला विकत होते. त्यासाठी तो माल कुठे पाठविला जात होता. कंपनीत लावण्यात आलेली यंत्र सामग्री यांची परवानगी घेण्यात आली होती का नाही. तसेच उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सरकारी यंत्रणांच्या परवानग्या घेतल्या होत्या की नाही. याचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्यासाठी आरोपीची पोलिस कोठडी वाढवून द्या अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
मलय आणि स्नेहा हे दोघीही कंपनीचे संचालक आहेत. कंपनी स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या तीन जणांची आेळख पटली आहे. बाकीच्या मृतदेहांची आेळख पटविण्यासाठी नातेवाईंकांचे डीएनए टेस्ट केली आहे. त्याचबरोबर मिळून आलेल्या काही मृतदेहांचे अवशेष फा’रेन्सीक ल’बला पाठविले आहेत.