"आपले पाप लपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर आरोप"; शिंदे गटाकडून भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर
By मुरलीधर भवार | Published: September 19, 2022 06:00 PM2022-09-19T18:00:45+5:302022-09-19T18:01:56+5:30
कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटात रस्त्यावरील खड्ड्यांवरून वादाची ठिणगी
कल्याण: रस्ते विकासाच्या निधीवरुन काल डोंबिवलीतील एका कार्यक्रमात मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नगरविकासला लक्ष केले. त्यांचा प्रत्यक्ष टोला हा सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच होता. त्यांच्या या टिकेची शिवसेनेच्या शिंदे गटाने गंभीर दखल घेत शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आपले पाप लविण्यासाठी मुख्यमंत्र्यावर मंत्री चव्हाण हे आरोप करीत असल्याचे प्रतिउत्तर दिले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांवरुन कल्याण डोंबिवलीतील भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे.
"यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार होते. महाविकास आघाडीच्या सरकार पूर्वी आमदार चव्हाण हे राज्यमंत्री होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते विरोधी बाकावर बसून विरोधकाची भूमिका बजावित होते. त्यांनी गेल्या अडीच वर्षात तत्कालीन पालक आणि नगरसविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना टिकेचे लक्ष्य केले. मात्र सत्ता बदलाच्या राजकारणात मंत्री चव्हाण हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून चव्हाण यांनी गुहाटीपासून मुंबईपर्यंतचा प्रवास केला. त्याच वेळी त्यांनी शिंदे यांच्या कानात सांगायला हवे होते. कोणती कामे रखडली आणि कोणती झाली आहेत. आत्ता सत्ता शिंदे-फडणवीस यांची आली आहे. या सत्तेत ते मंत्री आहेत, हेच चव्हाण विसरले आहेत. १३ वर्षात चव्हाण यांच्यामुळेच कामे रखडली", असा दावा दीपेश म्हात्रे यांनी चव्हाण यांच्या टिकेला उत्तर देताना केला.
"मंत्री चव्हाण हे वारंवार ४७२ कोटीची रस्ते विकासाची कामे मंजूर झाली होती. ती नामंजूर केल्याचा उल्लेख वारंवार करतात. त्यांनी ठामपणे सांगितले की, खरेच ही कामे मंजूर झाली होती. तर मी राजकारण सोडण्यास तयार आहे असे म्हात्रे यांनी सांगितले. खासदार आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वीच डोंबिवलीतील रस्ते विकासकरीता ३७० कोटी रुपयांची विकास कामे मंजूर केली आहे. याचा विसर चव्हाण यांना पडला आहे. त्यांच्या मतदार संघात दोन रस्ते येतात. या रस्त्याची कामे अद्याप सुरु झालेली नाहीत. ठाकूर्लीला रेल्वे उड्डाणपूलाचे एका बाजूचे काम रखडलेले आहे. याला जबाबदार कोण असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. ७२ तासात रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले पाहिजेत असा मुद्दा चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. ही बाब त्यांची चांगली असली तरी ७२ तासात खड्डे बुजविण्याकरीता त्यांनी का पुढाकार घेतला नाही", असाही प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केला.