पुराव्या अभावी आठ जणांची निर्दोष मुक्तता; कल्याण न्यायालयाचा निकाल
By सचिन सागरे | Published: April 25, 2023 05:36 PM2023-04-25T17:36:52+5:302023-04-25T17:39:32+5:30
त्यावेळी, टिटवाळा रेल्वे ट्रॅकवर लक्ष्मणचा मृतदेह आढळून आला.
सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : एकाच्या हत्येप्रकरणात कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याने कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर. जी. वाघमारे यांनी एनआरसी सुरक्षा रक्षकासह अन्य सात जणांची मंगळवारी निर्दोष मुक्तता केली.
जून २०१५ रोजी दुपारच्या सुमारास गुडडु मोहमंद उमर खान (३१, रा. मोहना, कल्याण) त्याचा मित्र लक्ष्मण भंडारी उर्फ काल्या मामा व लंबु असे तिघे जण मोहने येथील एनआरसी कंपनीमध्ये भंगार चोरी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी, कंपनीचे सुरक्षारक्षक शिवप्रसाद पांडे व अमर देसले यांनी गुड्डू व लक्ष्मण या दोघांना पकडून त्यांचे हातातील लोखंडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. संधी मिळताच गुड्डूने त्यांच्या तावडीतून पळ काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मण यांचे घरी गेलेल्या गुड्डूला तो घरी आला नसल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले. त्यानंतर, गुड्डूने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी, टिटवाळा रेल्वे ट्रॅकवर लक्ष्मणचा मृतदेह आढळून आला.
याप्रकरणी गुड्डूने दिलेल्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी सुरक्षारक्षक पांडे, देसले यांच्यासह राम प्रताप बैजनाथ सिंग, मुन्ना प्रताप तिवारी, धर्मेंद्र सिंग, आर. के. वानखेडे, नारद पांडे आणि प्रदीप उर्फ राजू घोटेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कल्याण न्यायालयात या आठ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान या आठ जणांविरोधात कोणतेही सबळ पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केली.
याप्रकरणी, आरोपींच्या वतीने वकील कार्तिक चव्हाण, अजयसिंग चौहान, मंगेश देशमुख, तृप्ती पाटील, राकेश सिंग, सलील बुटाला आणि मोहन हांडे यांनी काम पाहिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"