कल्याण पूर्वेत ६६ लाखांची वीजचोरी करणाऱ्या २४८ जणांविरुद्ध कारवाई

By अनिकेत घमंडी | Published: October 26, 2023 05:13 PM2023-10-26T17:13:32+5:302023-10-26T17:13:51+5:30

टिटवाळ्यातही आढळले ८४ वीजचोर

Action against 248 people who stole electricity worth 66 lakhs in Kalyan East | कल्याण पूर्वेत ६६ लाखांची वीजचोरी करणाऱ्या २४८ जणांविरुद्ध कारवाई

कल्याण पूर्वेत ६६ लाखांची वीजचोरी करणाऱ्या २४८ जणांविरुद्ध कारवाई

डोंबिवली: महावितरणच्या कल्याण पूर्व विभागात दोन दिवसांच्या व्यापक वीजचोरी शोध मोहिमेत ६६ लाख  रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी २४८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून टिटवाळा उपविभागातही ३८ लाख ७९ हजार रुपयांच्या वीजचोरी प्रकरणी एकाच दिवसात ८४ जणांविरुद्ध कारवाई झाली आहे.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील आणि कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वीजचोरी शोध मोहिम सुरू आहे. कल्याण पूर्व विभागातील अडिवली, ढोकली, मानपाडा, दावडी, हेदुटणे, घेसर, कोळेगाव, सोनारपाडा, काटेमानिवली, कटाई भागात ६ आणि १० ऑक्टोबरला व्यापक शोध मोहिम राबवण्यात आली. यात २४८ ग्राहकांकडे वातानुकूलन यंत्रणेसाठी थेट वीजवापर, मीटरमध्ये फेरफार, मीटरकडे येणाऱ्या केबलला टॅप करून वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. या ग्राहकांनी ६६ लाख रुपये किंमतीची ३ लाख ३ हजार ८०० युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून वीजचोरीचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याची नोटिस संबंधितांना बजावण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंते कांतीलाल पाटील, नितीन चंदनमोरे, मुंजा आरगडे, उपकार्यकारी अभियंता पद्माकर हटकर, अभियंते, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या चमुने ही कारवाई केली.

तर टिटवाळा उपविभागातील मांडा, गोवेली, कोन आणि खडवली शाखा कार्यालयांतर्गत १० ऑक्टोबरला घेतलेल्या व्यापक शोध मोहिमेत ८४ ठिकाणी वीजचोरी आढळली. या ८४ जणांनी ३८ लाख ७९ हजार रुपये किंमतीची १ लाख ८१ हजार युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. कल्याण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या नेतृत्वाखाली उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहायक अभियंते अभिषेक कुमार, तुकाराम घोडविंदे, कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे, सचिन पवार आणि जनमित्रांच्या टिमने ही कामगिरी केली.

Web Title: Action against 248 people who stole electricity worth 66 lakhs in Kalyan East

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.