वाडा उपविभागात २५ लाखांच्या वीजचोरी प्रकरणी ४९ जणांविरुद्ध कारवाई
By अनिकेत घमंडी | Published: March 1, 2024 05:37 PM2024-03-01T17:37:50+5:302024-03-01T17:38:19+5:30
या वीज चोरट्यांनी २५ लाख रुपये किंमतीची १ लाख ३२ हजार युनिट विजेची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
डोंबिवली: महावितरणच्या वाडा उपविभागात जानेवारी महिन्यात ४९ वीजचोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या वीजचोरट्यांनी २५ लाख रुपये किंमतीची १ लाख ३२ हजार युनिट विजेची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात वीजचोरी शोध मोहिम नियमितपणे सुरू आहे. त्यांतर्गत वाडा उपविभागातील वाडा, वावेघर, धुमालपाडा, आपटी, खरीवली, विवेकनगर, अम्बिस्ते, कांदिवली रोड आदी परिसरात व्यापक वीजचोरी शोध मोहिम राबवण्यात आली. या शोध मोहिमेत ४९ जणांकडून सुरू असलेली २५ लाख १० हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली. वीजचोरांमध्ये अम्बिस्ते ग्रामपंचायतीचाही समावेश असून या ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. वीजचोरीचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याच्या नोटिसा संबंधितांना बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत या रकमांचा भरणा टाळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे.
वाड्याचे उपविभागीय अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक व कनिष्ठ अभियंते, जनमित्र तसेच सुरक्षारक्षक यांच्या चमुने ही कामगिरी केल्याचे सांगण्यात आले.