डोंबिवलीत बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरूच; RTO ची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 03:39 PM2021-10-12T15:39:39+5:302021-10-12T15:40:03+5:30
वाहतूक शाखेकडून सर्व रिक्षा चालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून बेशिस्त रिक्षा चालकांवर यापुढे सुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार
कल्याण - डोंबिवली शहरामध्ये बहुतांश रिक्षाचालक हे कोणतेही नियम न पाळता मनमानी कारभार करताना दिसतात. याबाबत नागरिकांच्या तक्रारीही दिवसेंदिवस वाढत असून रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला लगाम घालण्यात यावा अशी मागणी देखील जोर धरु लागली होती. शुक्रवारी उप प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक विभागाने बेशिस्त रिक्षाचालकांवर धडक कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.सोमवारी पुन्हा नियम न पाळणा-या रिक्षाचालकांवर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे डोंबिवली वाहतूक शाखा पुन्हा ऍक्शन मोड मध्ये आल्याचं दिसून येत आहे.
सोमवारी मुख्यतः विनागणवेश, विना लायसन्स,विना बॅच व कोविड च्या अनुषंगाने मार्च 2020 पूर्वी पासींग/इतर कागदपत्रांची मुदत संपलेल्या 110 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आली असून एकूण 1 लाख 6 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच 80 रिक्षाचालकांवर कारवाई करत 1 लाख 13 हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. तसेच 2 रिक्षाही जमा करण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेकडून सर्व रिक्षा चालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून बेशिस्त रिक्षा चालकांवर यापुढे सुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं डोंबिवली वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितलं आहे.