डोंबिवलीत बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई; पोलिसांकडून दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 06:02 PM2021-10-09T18:02:01+5:302021-10-09T18:02:45+5:30
शुक्रवारी उप प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक विभागाने बेशिस्त रिक्षाचालकांवर धडक कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे.
कल्याण- डोंबिवली शहरामध्ये बहुतांश रिक्षाचालक हे कोणतेही नियम न पाळता मनमानी कारभार करताना दिसतात. याबाबत नागरिकांच्या तक्रारीही दिवसेंदिवस वाढत असून रिक्षाचालकांच्या बेशिस्तीला लगाम घालण्यात यावा अशी मागणी देखील जोर धरु लागली होती. शुक्रवारी उप प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक विभागाने बेशिस्त रिक्षाचालकांवर धडक कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे.
गणवेश परिधान न करणे, कागदपत्रांची पूर्तता न करणे ,लायसन नसणे अशा कारणावरून 80 रिक्षाचालकावर दांडात्मक कारवाई करत एकूण सुमारे एक लाख 13 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच 2 रिक्षा जमा करण्यात आल्या आहेत. अनेक रिक्षाचालकांनी गेल्या दोन वर्षांपासून कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याची बाब यावेळी समोर आली. ज्या रिक्षाचालकांना ख-या अर्थाने मेडिकलची समस्यां होती अशा रिक्षाचालकांना सवलत देऊन सोडण्यातही आले मात्र काही चालकांनी जाणूनबुजून कागदपत्रांची पूर्तता करण्यात टाळाटाळ केल्याचही दिसून आलं.
अशा चालकांवर मात्र कारवाई करण्यात आली अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे. डोंबिवली वाहतूक शाखेकडून सर्व रिक्षा चालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून बेशिस्त रिक्षा चालकांवर यापुढे सुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार आहे असं वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितलं आहे.