चाकुचा धाक दाखवून जबरीचोरी करून फरार झालेले जेरबंद; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
By प्रशांत माने | Published: November 16, 2023 02:34 PM2023-11-16T14:34:52+5:302023-11-16T14:37:04+5:30
याउपरही त्याने मनाई केलेल्या हद्दीत दहशत माजविण्याचा प्रकार केल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेतून समोर आले आहे.
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: चाकुचा धाक दाखवून जबरी चोरी करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगारांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. यातील प्रमुख आरोपी अक्षय उर्फ सोनू किशोर दाते ला तडीपार केले आहे. याउपरही त्याने मनाई केलेल्या हद्दीत दहशत माजविण्याचा प्रकार केल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेतून समोर आले आहे.
आता मार्केट खुप बदललय, पहिल्या सारखी दुनिया राहिली नाही, तु लहानपणी पाहिलेला सोनू आता तो सोनू नाही आता मी भाई आहे, तु मला काळा का बोलला असे बोलून हर्षद सरवदे याला अक्षयने आणि अन्य दोघा साथीदारांनी मारहाण करीत त्याच्याकडील २ हजार ६०० रूपयांची रोकड चाकुचा धाक दाखवित चोरून नेली होती. हा प्रकार डोंबिवली पूर्वेकडील चिमणी गल्लीतील राजु वडापाव दुकानाजवळ मंगळवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी स्थानिक रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण शाखा करीत होती.
वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष उगलमुगले, पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, पोलिस हवालदार अनुप कामत, बापुराव जाधव, पोलिस नाईक सचिन वानखेडे, दिपक महाजन, पोलिस कॉन्स्टेबल रविंद्र लांडगे आदिंचे पथक तपासकामी नेमले होते. पोलिस नाईक वानखेडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरिक्षक राहुल मस्के यांच्या पथकाने बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास दत्तनगर येथील प्रगती कॉलेज जवळ सापळा लावून अक्षय दाते आणि त्याचा साथीदार रोहीत भालेराव या दोघांना जेरबंद केेले. दोघेही सराईत गुन्हेगार असून यातील अक्षय ला मुंबई, ठाणे, रायगड या जिल्हयातून हद्दपार केले गेले आहे अशी माहिती मस्के यांनी दिली. दरम्यान अन्य एक आरोपी अदयापही मिळून आलेला नाही.