टोइंग व्हॅनची वाहनांवर कारवाई सुरू, पहिला दिवस जनजागृतीचा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 06:50 PM2022-11-01T18:50:08+5:302022-11-01T18:50:46+5:30
शहरात मंगळवारपासून सुमारे वर्षभरानंतर टोइंग व्हॅनद्वारे दुचाकींवर वाहने उचलण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
डोंबिवली:
शहरात मंगळवारपासून सुमारे वर्षभरानंतर टोइंग व्हॅनद्वारे दुचाकींवर वाहने उचलण्याची कारवाई सुरू करण्यात आली. अनेक महिन्यानी पहिला दिवस।असल्याने व्हॅन ठेकेदाराने कडक करवाईवर भर न देता नागरिकांमध्ये जनजागृती केली. आणखी दोन दिवस नागरिकांना सूचित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
शहरात मुख्य रस्त्यांवर नियमबाह्य उभी असलेली वाहने उचलण्यात येत होती, मात्र गेल्या वर्षी काही तांत्रिक कारणांनी व्हॅन सेवा बंद करण्यात आली होती, त्यामुळे काही महिन्यांपासून वाहने कुठेही पार्क केली जात असल्याचा असंख्य तक्रारींनी ट्रॅफिक विभाग त्रस्त झाला होता. अखेर मंगळवारी वाहने उचलण्यास सुरुवात झाली असल्याचे ट्रॅफिक विभागाने स्पष्ट केले. फडके पथ, भगतसिंग रस्ता, मानपाडा रस्ता, एमआयडीसी रस्ता, केळकर रोड, रामनगर, टाटा लेन यांसह पश्चिमेला महात्मा फुले पथ, सुभाष रोड, पंडित दीनदयाळ रोड आदी भागात कारवाई होणार असून ठाकुर्लीतही हमरस्त्यांवर नियमबाह्य वाहने पार्क।केली असल्यास टोइंग व्हॅनची कारवाई कडक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
आरटीओला रिक्षा मीटरसक्तीला मुहूर्त मिळेना? रिक्षेचे सुधारित भाडे आकारण्यात येत असले तरीही शहरात तसेच कल्याण मध्ये कुठेही मीटरने रिक्षा वाहतूक अध्याप सुरू नाही, तसेच स्टेशन परिसरात रिक्षा संघटना मीटरने सेवा सुरू करण्यास सकारात्मक पवित्रा घेतला असला तरीही आरटीओने कानाडोळा केला असून आरटीओ अधिकारी त्यासाठी सकारात्मक नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत एआरटीओ विनोद साळवी यांच्याशी संपर्क साधला असता ते मिटींगमध्ये व्यस्त असल्याचे म्हणाले. त्यामुळे टोइंग व्हॅन द्वारे दुचाकींवर कारवाई होत असली तरीही मीटरने रिक्षा वाहतुकीला सुरुवात होत नाही त्याबाबत मात्र नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.