नाल्यात निळाई; जीन्स व एसिड फॅक्टरी, भंगार गोदामांवर कारवाई
By प्रशांत माने | Published: April 3, 2024 05:28 PM2024-04-03T17:28:08+5:302024-04-03T17:28:57+5:30
एमआयडीसी विभागातील प्रदूषणाचा त्रास स्थानिकांना अधूनमधून होत असतो. याआधी रस्ते गुलाबी होणे, हिरवा पाऊस पडणे तसेच नाल्यामधून निळे पाणी वाहण्याचे प्रकार घडले असताना पुन्हा एकदा मंगळवारी येथील निवासी भागातील नाल्यामधून निळे पाणी वाहिले होते
डोंबिवली: एमआयडीसी निवासी भागातील एका नाल्यातून निळे पाणी वाहत असल्याचा प्रकार मंगळवारी आढळुन आला होता. पाण्यात केमिकल सोडल्याने पाणी निळे झाल्याचा आरोप झाला असताना बुधवारी कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केडीएमसी यांनी संयुक्तपणे सोनारपाडा, माणगाव येथील जीन्स धुण्याच्या तसेच साबण तसेच एसिड बनविणा-या कारखान्यांसह भंगार गोदामांवर कारवाई केली.
एमआयडीसी विभागातील प्रदूषणाचा त्रास स्थानिकांना अधूनमधून होत असतो. याआधी रस्ते गुलाबी होणे, हिरवा पाऊस पडणे तसेच नाल्यामधून निळे पाणी वाहण्याचे प्रकार घडले असताना पुन्हा एकदा मंगळवारी येथील निवासी भागातील नाल्यामधून निळे पाणी वाहिले होते. रासायनिक कंपन्यांनी केमिकल सोडल्याने नाल्यातील पाणी निळे झाल्याचा आरोप मनसेने केला होता. मात्र हा आरोप कामा संघटनेने फेटाळला होता. तर कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केडीएमसीच्या अधिका-यांनी निळे पाणी कशामुळे वाहतेय याचा तपास सुरू केला होता. दरम्यान या शोध मोहीमेत कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी, केडीएमसीचे ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार आणि कामा संघटनेचे देवेन सोनी सहभागी झाले होते. या धाडीत ललित काटा सोनारपाडा येथे बंद पडलेल्या एका बेकरीमध्ये जीन्स धुण्याचा कारखाना चालू असल्याचे निदर्शनास पडले. येथुनच निळे पाणी वाहत होते. साबण आणि अॅसिड बनविणा-या अशा दोन फॅक्टरी माणगाव परिसरात चालू असल्याची आढळुन आली. कारखाने आणि दोन्ही फॅक्टरी सील करण्यात आली आहेत. सोनारपाडा येथील आठ भंगाराची गोदामे देखील या कारवाईत तोडण्यात आली. यापुढेही अवैध कारखाने, फॅक्टरी आणि भंगार गोदामांवर कारवाई सुरूच राहील अशी माहिती मनपा ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी दिली.