डोंबिवलीत दुकानांवर कारवाई, दोन दुकान सील; उर्वरित दुकानांकडून दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 06:01 PM2021-07-17T18:01:20+5:302021-07-17T18:01:36+5:30
CoronaVirus : सोमवार ते शुक्रवारपर्यत दुपारी चारनंतर आणि शनिवार व रविवारी संपूर्ण दिवसभर दुकाने बंद असावेत, असे निर्देश आहेत.
कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी नियम उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर अधिक कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानूसार डोंबिवलीमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान दोन दुकानं सील करण्यात आली, तर अन्य सहा दुकानदारांकडून एकूण 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सोमवार ते शुक्रवारपर्यत दुपारी चारनंतर आणि शनिवार व रविवारी संपूर्ण दिवसभर दुकाने बंद असावेत, असे निर्देश आहेत. डोंबिवली पूर्वेकडील "फ" प्रभाग क्षेत्राच्या अखत्यारीत येणाऱ्या काही दुकानांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. कैलास लस्सी आणि मिठाईवाले या दुकानदाराने दुसऱ्यांदा नियमांचे भंग केल्याने त्यांच्याकडून 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पहिल्यांदाही या दुकानावर कारवाई करत 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. तर तिसऱ्यांदा नियम मोडल्यास दुकान सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याच दुकानाच्या बाजूला असलेल्या एजे स्वीट दुकानावरही पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. दोन दुकांनांकडून प्रत्येकी 10 हजार रुपये तीन दुकानांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये असे एकूण 45 हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचे फ प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील यांनी सांगितले. तर दोन दुकानं सील करण्यात आल्याचेही ते म्हणाले.