"वय हा मुद्दा नाही, बलात्कार हा बलात्कारच"; आदित्य ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 02:35 PM2024-08-20T14:35:00+5:302024-08-20T15:19:26+5:30
बदलापूर प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांनी शक्ती कायद्यासंदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे मागणी केली आहे.
Badlapur School Case: बदलापूरातील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैगिंक अत्याचाराच्या प्रकरणामुळे बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त पालकांनी शाळेबार निदर्शने केली. त्यानंतर आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी करत नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकार रेल्वे मार्ग रोखून धरला आहे. आंदोलकांना पांगवताना झालेल्या लाठीचार्जनंतर पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याने तिथलं वातावरण तापलं आहे. दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावरुन थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे.
बदलापूरच्या आदर्श विद्यालयात एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या चिमुरड्यांवर तिथेच काम करणाऱ्या २४ वर्षीय आरोपीने लैंगिक अत्याचार केला. आठवड्याभरानंतर ही घटना उघडकीस आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत नागरिकांकडून बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. संतप्त नागरिकांकडून रेल रोको देखील करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत शक्ती कायद्यासंदर्भात निर्णय घेण्याची राष्ट्रपतींकडे मागणी केली आहे.
"दररोज आम्ही महिलांसाठी सेल्फ डिफेन्स क्लासेस सुरू करण्याचा विचार करतो. खरं तर असं आम्ही यापूर्वी केले होते. मात्र मनातील एक खोल आवाज मला विचारतो पण का? आम्ही लवकरच क्लास सुरू करणार असलो तरी, दुर्दैवाने असे क्लास सुरु करणे काळाची गरज आहे. तरीही प्रश्न उरतोच की असं का? सुरक्षेची जबाबदारी महिलांवर का असावी? समाज आणि कायदा महिलांच्या सुरक्षिततेची खात्री का देऊ शकत नाही. आपल्याला देशभरातून रोज विनयभंग, बलात्काराच्या घटनांबद्दल ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आपला संताप होतो. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा, निष्पक्ष न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. मानवतेविरुद्धचा गुन्हा म्हणता येईल असा बलात्कारासारखा अपराध सहन करता येणार नाही," असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
"आज बदलापूर प्रकरणाबद्दल ऐकून मन हेलावून गेलं. पुन्हा एकदा हेच सांगू इच्छितो की वयोगट हा काही फरकाचा मुद्दा असू शकत नाही. बलात्कार हा बलात्कार असतो. आम्हाला न्याय हवा आहे, आम्हाला कठोर शिक्षेची उदाहरणे हवी आहेत ज्यामुळे या बलात्काऱ्यांच्या मनात भीती निर्माण होईल. महाराष्ट्राबाबत मी पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना विनंती करतो की, प्रदीर्घ प्रलंबित अशा महाराष्ट्र शक्ती विधेयकाला संमती द्यावी. यामुळे महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांसंदर्भातील कायद्याचे सक्षमीकरण होईल. मी हे आधीही बोललो होतो आणि पुन्हा सांगतो, बलात्काऱ्याला दहशतवाद्यासारखी वागणूक द्या!," असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
Everyday that we think of starting off with “self defence classes” for women, like we did earlier, a deeper voice asks me why?
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 20, 2024
And even though we will start soon, since the times demand it unfortunately, the question still is why?
• Why should the responsibility of safety be…
शक्ती कायदा आणण्यासाठी किती घटनांची वाट बघणार - रोहित पवार
"बदलापूर येथे घडलेली अत्याचाराची घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. दुर्दैवी घटना घडल्यावर दोन दिवस समाज पेटून उठतो, परंतु दुर्दैवाने ही आग दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. दोषींना फाशी द्या ही नागरिकांची तर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कठोर शिक्षा देऊ ही सरकारची नेहमीची प्रतिक्रिया झाली आहे. वारंवार अशा घटना घडत असताना आपण व्यवस्था म्हणून काय करतोय याचा विचार करणे गरजेचे आहे. लाडक्या बहिणींच्या, लाडक्या लेकींच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेला शक्ती कायदा अस्तित्वात आणण्यासाठी अजून अशा किती घटनांची वाट बघणार?," असा सवाल रोहित पवार यांनी केला.