कल्याण पाठोपाठ डोंबिवलीतही मराठा समाजाचे साखळी उपोषण
By प्रशांत माने | Published: November 2, 2023 02:50 PM2023-11-02T14:50:41+5:302023-11-02T14:51:05+5:30
मंगळवारी सकल मराठा समाजाच्या पार पडलेल्या बैठकीत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
डोंबिवली: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी डोंबिवलीतील सकल मराठा समाजाच्या वतीने आजपासून साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. मंगळवारी सकल मराठा समाजाच्या पार पडलेल्या बैठकीत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पूर्वेकडील इंदिरा गांधी चौकात हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. कल्याणमध्येही गेल्या शुक्रवारपासून मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. आज तेथील उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान डोंबिवलीत सुरू झालेल्या साखळी उपोषणाला मोठया संख्येने मराठा बांधव आणि भगिनींनी उपस्थिती लावली होती. आंदोलन हे शांततेत करण्याचे आवाहन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.