उल्हासनगरात दिड वर्षानंतर वाजली शाळेची घंटा, मुलांमध्ये उत्साह, महापौरांनी केलं मुलांचं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 04:04 PM2021-10-04T16:04:50+5:302021-10-04T16:06:55+5:30
शाळा प्रशासनांनी मुलांना कोरोनाच्या लक्षणांचा व सर्दी, खोकला, ताप याबाबत माहिती देऊन मुलांची तपासणी करून मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला.
उल्हासनगर- कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या शाळेची दिड वर्षानंतर घंटा वाजली असून महापौर लिलाबाई अशान, सभागृहनेते भारत गंगोत्री, शिक्षण सभापती शुभांगी बहेनवाल, नगरसेवक अरुण अशान आदींनी मुलांचे स्वागत केले. तर अनेक शाळेत ढोल ताशे वाजवून मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
उल्हासनगरात गेल्या दिड वर्षांनंतर शाळेची घंटा वाजल्याने, शाळेत येणाऱ्या मुलांच्या स्वागतासाठी महापौर लिलाबाई अशान, सभागृहनेते भारत गंगोत्री, शिक्षण सभापती शुभांगी बहेनवाल, शिवसेना उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान न्युइरा शाळेसह इतर शाळेत उपस्थित होते. मुलांना गुलाब फुल, वही, पेन, पेन्सिल, वही देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी, शिक्षण विभागाचे उपायुक्त दिपक जाधव यांनीही मुलांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. इयत्ता ८ च्या पुढील वर्गाच्या शाळा सुरू झाल्या असून मुलांनी शाळा सुरू झाल्या बाबत आनंद व्यक्त केला. मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी शाळा समोर रांगोळी टाकून तसेच ढोल ताशे वाजवून मुलांचे स्वागत केले. तसेच त्यांनी शाळेत प्रवेश करताच मुलांच्या अंगावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
शाळा प्रशासनांनी मुलांना कोरोनाच्या लक्षणांचा व सर्दी, खोकला, ताप याबाबत माहिती देऊन मुलांची तपासणी करून मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला. स्वामी शांती प्रकाश शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे स्वागत स्थानिक नगरसेवक विजय पाटील यांनी करून मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. तर नागसेन विद्यालयात शाळेचे संस्था प्रमुख जे एम सिरसाट, मुख्याध्यापक अनिता सोनावणे, प्रदीप पाटील यांनी मुलांचे ढोल ताशांनी स्वागत केले. तक्षशिला विद्यालय, यशवंत विद्यालय, रमाबाई आंबेडकर विद्यालय यांच्यासह अन्य शाळेतही मुलांचे स्वागत केले. महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी मोहिते यांनीही मुलांचे स्वागत केले.