कल्याणमध्ये आगरी कोळी आणि वारकरी भवन उभारण्यात यावे!
By मुरलीधर भवार | Published: March 21, 2023 09:16 PM2023-03-21T21:16:07+5:302023-03-21T21:16:22+5:30
कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांची विधानसभेत मागणी
मुरलीधऱ भवार, कल्याण: येथील आगरी कोळी समाज बांधव जास्त प्रमाणात आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदायही मोठय़ा प्रमाणात आहे. आगरी कोळी आणि वारकरी भवन तयार करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आज विधानसभेत केली आहे.
ठाणे, रायगड जिल्ह्यात आगरी कोळी समाज बांधवांची संख्या जास्त आहे. कल्याणमध्येही आगरी कोशी समाजाचे लोक जास्त प्रमाणात वास्तव्य करुन आहे. आगरी कोळी समाजाची कल्याणमध्ये एक लाख इतकी लोकसंख्या आहे. या समाजाकडून आगरी कोळी महोत्सव, नारळी पौर्णिमा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, राष्ट्रीय आणि विविध सण साजरे केले जातात. मात्र समाजाकरीता स्वतंत्र अशी वास्तू नाही. कल्याण पश्चिमेला असलेल्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर आगरी कोळी भवन उभारण्यात यावे.
आगरी कोळी समाजाच्या भवन उभारण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत मंजूर आहे. त्याची अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्याचबरोबर कल्याण पश्चिमेत वारकरी संप्रदायाचे लोक जास्त आहे. संत सावळाराम महाराज आणि शंकर महाराज शहाडकर यांना मानणारा मोठा वारकरी वर्ग आहे. महापालिकेकडे आरक्षित भूखंड आहेत. या आरक्षित भूखंडावर वारकरी भवनाची उभारणी करण्यात यावी. तसे आदेश राज्य सरकारने महापालिका प्रशासनास द्यावे. राज्य सरकारने यंदा सादर केलेल्या राज्याच्या अर्थ संकल्पात विविध योजना राबविण्याचे जाहिर केले आहे. त्याकरीता आर्थिक तरतूद केली आहे. या तरतूदीच्या माध्यमातून कल्याण पश्चिम भागात आगरी कोळी आणि वारकरी भवन उभारण्याकरीता महापालिकेस निधीही उपलब्ध करुन द्यावा याकडे राज्य सरकारडे आमदार भोईर यांनी लक्ष वेधले आहे.