आगरी महोत्सवात ४ लाखांहून अधिक गर्दीचा नवा उच्चांक

By मुरलीधर भवार | Published: December 21, 2023 04:01 PM2023-12-21T16:01:43+5:302023-12-21T16:02:03+5:30

१९ व्या आगरी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Agari Mahotsav breaks new high of over 4 lakh crowd | आगरी महोत्सवात ४ लाखांहून अधिक गर्दीचा नवा उच्चांक

आगरी महोत्सवात ४ लाखांहून अधिक गर्दीचा नवा उच्चांक

डोंबिवली : आगरी समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या अखिल भारतीय आगरी महोत्सवात यंदा गर्दीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला. महोत्सवाच्या आठ दिवसांच्या काळात तब्बल चार लाखांहून अधिक नागरिकांनी आगरी संस्कृती अनुभवली. महोत्सवाची बुधवारी सांगता करताना संयोजन समितीचे अध्यक्ष गुलाब वझे व इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल जनतेचे आभार मानले. यापुढील काळात संत सावळाराम महाराजांच्या भव्य स्मारकासह समाजासाठी आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतील, अशी घोषणा अध्यक्ष गुलाब वझे यांनी केली.

मुंबई, ठाण्यासह रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम २००४ मध्ये डोंबिवली येथे आगरी महोत्सव सुरू झाला होता. यंदा महोत्सवाचे १९ वे वर्ष होते. त्यानिमित्ताने नागरिकांसाठी आगरी खाद्य संस्कृती, परंपरेचे दर्शन घडविण्याबरोबरच सामाजिक भान राखून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. १३ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या महोत्सवाचा काल रात्री समारोप करण्यात आला. त्यावेळी गुलाब वझे यांच्यासह मंचावर विश्वनाथ रसाळ, जालिंदर पाटील, रामकृष्ण पाटील, प्रकाश भंडारी, पांडुरंग म्हात्रे, शरद पाटील, दिलीप देसले, संतोष संत, गुरुनाथ म्हात्रे, जयेंद्र पाटील, भानुदास भोईर, नारायण म्हात्रे, कांता पाटील, अनंत पाटील, विनायक पाटील, अशोक पाटील, सदानंद म्हात्रे, प्रवीण पाटील, सल्लागार विजय पाटील, राम पाटील, प्रभाकर चौधरी, गंगाराम शेलार, सुभाष चं. म्हात्रे, चंद्रकांत पाटील, डॉ. दिनेश म्हात्रे, सुरेश जोशी, नंदू म्हात्रे, रंगनाथ ठाकूर, ग्लोबल कॉलेजच्या प्राचार्या सुप्रिया नायकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

या महोत्सवात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी आमदार सुभाष भोईर, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, पनवेल येथील समाजाचे नेते बबन पाटील, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आदींसह मान्यवर नेते, माजी नगरसेवक-नगरसेविका आदींनी महोत्सवाला भेट दिली. या महोत्सवात नागरिकांनी खाद्य व मनोरंजनाबरोबरच विविध विषयांवरील चर्चाही ऐकली. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देणे, मराठी भाषेचे संवर्धन व जतन, ओबीसी आरक्षण आदी विषयांवरील कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

या महोत्सवाच्या यशाबद्दल अध्यक्ष गुलाब वझे यांनी नागरिकांना धन्यवाद दिले. मुंबई, ठाणे जिल्ह्याबरोबरच रायगड व पालघर जिल्ह्यातील नागरिकांनीही महोत्सवात सहभागी होऊन आनंद लुटला.

संत सावळाराम महाराजांच्या स्मारकासाठी सर्वोच्च प्राधान्य

संत सावळाराम महाराज यांचे नेतिवली येथे दहा एकरात भव्य स्मारक उभारण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. या स्मारकाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून संपूर्ण सहकार्य केले जात आहे. त्याचबरोबर २७ गावांमधील वाढत्या करांना माफी, शीळफाटा रस्त्याला संत सावळाराम महाराजांचे नाव, आगरी युथ फोरमच्या महाविद्यालयाला जागा यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली.

Web Title: Agari Mahotsav breaks new high of over 4 lakh crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.