वीजबिले कमी न झाल्यास आक्रमक भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 01:42 AM2020-11-28T01:42:29+5:302020-11-28T01:42:45+5:30
मनसेचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
डाेंबिवली : वाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ मनसेने गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धिक्कार मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारत मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक केली. तरीही मनसे नेते अभिजित पानसे, ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, कल्याण ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, डोंबिवली शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे आदी उपस्थित होते. दरम्यान, वीजबिले कमी न झाल्यास मनसे आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा देण्यात आला आहे.
भोईर यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यावेळेस वीजबिल माफ करू, असा शब्द सरकारने दिला होता. सरकारने तो पाळवा अन्यथा आगामी काळात मनसे अधिक तीव्र भूमिका घेईल, असा इशारा त्यांनी दिला. तर, म्हात्रे म्हणाले, ‘सरकार वाढीव वीजबिले माफ करत नसेल, तसेच घरात उपाशी मरण्यापेक्षा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून छातीवर गोळ्या झेललेल्या बऱ्या, या विचाराप्रत जनता आलेली आहे. हे ओळखून मनसे सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्व ताकदीनिशी उतरून हा निर्णय रद्द करायला लावल्याशिवाय राहणार नाही.’