केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या दौऱ्यापूर्वी कल्याणमधील रस्ते झाले चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2022 11:10 AM2022-12-23T11:10:57+5:302022-12-23T11:11:37+5:30
कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्वसी सोहळ्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कल्याणात येत आहेत.
कल्याण - शहरात कोणी बडा नेता येणार असला की सर्व यंत्रणा कशा कामाला लागतात...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डोंबिवली दौरा झाला तेव्हाही मोठ्या प्रमाणावर शहरात स्वच्छता करण्यात आली होती...शुक्रवारी सकाळी केंद्रीय मंत्री हे कल्याणात येणार असल्याने रस्ते चकाचक करण्यात आले होते...अचानक शहरात हा कायापालट कसा काय? असा विचार करत नागरीकांनीही भुवया उंचावल्या होत्या.
कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्वसी सोहळ्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कल्याणात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून ते येणारे मार्ग अत्यंत सुव्यवस्थित आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय..काही वर्षांपूर्वी गडकरी यांनी डोंबिवली शहराचा उल्लेख अत्यंत घाणेरडे शहर म्हणून केला होता. तशी वेळ पुन्हा कल्याण शहराच्या नशिबी येऊ नये यासाठी जोरदार तयारी करण्यात आलीये.
गडकरी यांच्या नजरेत कल्याण शहर सुंदर दिसण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने आटापिटा चालवला आहे. ते येणाऱ्या रस्त्यावरील पावसाळ्यापासूनचे खड्डे रातोरात भरले असून त्या रस्त्यांची सजावटही केली जात आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला फवारणी सुद्धा करण्यात आलीये..मुख्य रस्ते जरी चांगले दिसत असले तरी याच रस्त्यांना लागून असणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर मात्र दुरवस्था दिसत आहे. त्यामुळे रोज मंत्र्यांचे दौरे शहरात झाले तर शहर किती सुंदर दिसेल अशा उपरोधिक भावना नागरिक व्यक्त करत आहेत.