अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 10:47 AM2024-09-24T10:47:21+5:302024-09-24T10:48:11+5:30
Akshay Shinde Encounter Badlapur: अत्याचाराची घटना उघड झाली त्या दिवशी हजारोंच्या जमावाने निषेध नोंदवत बदलापूर रेल्वेस्थानकावर आठ तास रेल्वे रोखून धरल्या होत्या. या आंदोलनात विरोधकांचे लोक असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता. आता सत्ताधाऱ्यांकडून आनंद साजरा.
बदलापूर शाळेतील लहान विद्यार्थीनींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी रात्री एन्काउंटर करण्यात आला. यावेळी अनेकांनी या घटनेचे राजकारण करू नये असा सल्ला दिलेला आहे. असे असताना विरोधकांनी या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शाळेचे संचालक मंडळ बीजेपी, आरएसएसचे असल्याने त्यांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला असे आरोप होत आहेत. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर शिंदे गटाने बदलापूर स्थानकावर पेढे भरवत आनंद साजरा केला आहे.
अत्याचाराची घटना उघड झाली त्या दिवशी हजारोंच्या जमावाने निषेध नोंदवत बदलापूर रेल्वेस्थानकावर आठ तास रेल्वे रोखून धरल्या होत्या. या आंदोलनात विरोधकांचे लोक असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता. हे लोक बाहेरचे होते, असेही आरोप केले जात होते. परंतू, पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यांत हे लोक बदलापूरचेच होते हे स्पष्ट झाले होते. या आंदोलनात सर्वपक्षीय जरी असले तरी ते सामान्य नागरिक म्हणून सहभागी झाले होते. आता अक्षय शिंदे प्रकरण सत्ताधाऱ्यांना शेकण्याची चिन्हे असताना त्याचा एन्काउंटर झाल्याने एकनाथ शिंदे शिवसेनेने त्याच बदलापूर रेल्वे स्थाानकावर जात आनंदोत्सव साजरा केला आहे.
अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये आनंद साजरा करण्यात आला. पेढे वाटून फटाके वाजविण्यात आले. ''एकनाथ एक न्याय बलात्काराला थारा नाय'' अशा घोषणा देण्यात आल्या. शिंदे सरकारचे अभिनंदन अशा आशियाचे बॅनर हातात घेऊन शिवसेना शिंदे गटाकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
रेल्वे स्थानकाबाहेरही महिला आनंदी...
बदलापूर रेल्वे स्टेशन बाहेर आज महिलांनी मोठ्या उत्साहात पेढे वाटत, फटाके वाजवत जल्लोष साजरा केला. सर्वपक्षीय आणि सर्वसामान्य महिलांनी एकत्र येऊन हा आनंद साजरा केला. हा जल्लोष बदलापूरमधील दोन चिमुकलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटरनंतर करण्यात आला."आम्ही अनेकदा अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. राजकारण कितीही झाले, तरी आम्हाला आनंद आहे की आज नराधमाचा अंत झाला. आता भविष्यामध्ये अशा घटनांमध्ये कमी येईल अशी आशा आहे.", असे या महिलांनी सांगितले.