अरेच्चा, पुन्हा डांबरच! निवासी भागातील रहिवासी संभ्रमात : दिलासा तात्पुरता; पण खड्ड्यांची मालिका जैसे थे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 11:34 AM2023-05-27T11:34:00+5:302023-05-27T11:34:06+5:30
सध्या निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रोड, सुदर्शन नाका येथून घरडा सर्कलकडे जाणारा रोड, सिस्टर निवेदिता हायस्कूलसमोरील रोड, मिलापनगर तलाव, निवासी भाग शेवटचा बस स्टॉप या रस्त्यांवर सिमेंट काँक्रीटची कामे सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : एमआयडीसी निवासी भागातील रस्ते लवकरच सिमेंट काँक्रीटचे होऊन खड्ड्यातून मुक्तता होणार, अशा आशयाचे जाहीर फलक जागोजागी लावून श्रेय लाटले गेले आहे. गुरुवारपासून एका महत्त्वाच्या रस्त्यावर डांबराचे पॅच पडू लागल्याने रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पावसाळ्यापूर्वी या डांबरीकरणाने काहीसा दिलासा मिळाला असला तरी काँक्रीटअभावी पावसाळ्यात यंदाही काही महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका जैसे थे राहणार यात शंका नाही.
सध्या निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रोड, सुदर्शन नाका येथून घरडा सर्कलकडे जाणारा रोड, सिस्टर निवेदिता हायस्कूलसमोरील रोड, मिलापनगर तलाव, निवासी भाग शेवटचा बस स्टॉप या रस्त्यांवर सिमेंट काँक्रीटची कामे सुरू आहेत. पण ती अर्धवट स्थितीत असल्याने पावसाळ्यात या परिसरात पाणी साचून बंगले आणि सोसायट्यांत घुसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मॉडेल कॉलेज परिसर आणि भाजी गल्लीचा रोड असो अथवा सर्व्हिस रोड हे महत्त्वाचे रस्तेही काँक्रीटचे होणे आवश्यक असताना यातील भाजी गल्लीच्या रोडवर सध्या डांबराचे पॅच मारले जात आहेत. त्यामुळे निवासी भागातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटच्या कामांसाठी ५६ कोटींचा मंजूर झालेला निधी नेमका कुठल्या रस्त्यासाठी वापरला जाणार, असाही प्रश्न रहिवाशांपुढे उभा राहिला आहे.
डांबरी पॅच किती दिवस टिकतील हेही महत्त्वाचे आहे. विलंब लागला असता तरी परवडला असता; पण भाजीगल्लीसह, सर्व्हिस रोड सिमेंट काँक्रीटचा रस्ता होणे महत्त्वाचे होते. डांबराचे पॅच मारून नाहक खर्च कशाला, अशी भावनाही रहिवाशांची आहे. सध्या सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या पॅचवरूनही राजकीय पक्षांकडून श्रेय लाटणे सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन्ही रस्ते काँक्रीटचे होणे महत्त्वाचे
सर्व्हिस रोड कल्याण-शीळ रोडला समांतर असल्याने त्यावरून वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. सात वर्षे या रस्त्यासह अन्य महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्ड्यांचा त्रास आम्ही सहन करीत आहाेत. गुरुवारपासून भाजी गल्ली रोडवर सुरू झालेले डांबरी पॅचचे काम पाहता आम्हा रहिवाशांत संभ्रम आहे. सिमेंट काँक्रीटचा रस्ता करून एकदाच काय ते खड्ड्यांच्या त्रासातून मुक्त करणे आवश्यक असताना डांबरी पॅचने यंदाही खड्ड्यांचा सिलसिला कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- जयसिंग आयरे, सुदामानगर निवासी, एमआयडीसी