'युती वेगळ्या विचारांनी अन् उद्देशाने झालीय,आम्ही सगळे एकत्र'; श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 01:52 PM2023-06-17T13:52:52+5:302023-06-17T14:04:59+5:30
युती धर्माचे पालन करण्याचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेत्यांना समज दिल्याचं सांगण्यात येत आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत काम न करण्याचा ठराव भाजपाने कल्याण जिल्ह्याच्या लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत केला. यानंतर शिवसेना विरुद्ध भाजपा असा वाद पेटला होता. मात्र या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तोडगा निघाल्याची माहिती समोर आली होती.
युती धर्माचे पालन करण्याचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेत्यांना समज दिल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर आज श्रीकांत शिंदे यांनी देखील युती किरकोळ कारणाने तुटणार नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे. कल्याण पूर्व येथील लोकग्राम पुलाचा भूमिपूजन सोहळा शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपाचे नेते रविंद्र चव्हाण हे अनुपस्थित होते.
रविंद्र चव्हाण यांच्या अनुपस्थितीमुळे शिवसेना आणि भाजपामध्ये निर्माण झालेली दरी कमी होण्याचं नाव घेत नाही, अशी चर्चा कार्यक्रमादरम्यान सुरू झाली होती. मात्र शिवसेना-भाजपा युतीत सगळे आलबेल आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. रविंद्र चव्हाण यांचे वेगळे कार्यक्रम आहेत. इथे सगळ चांगल चाललं आहे. युती वेगळ्या विचारांनी-उद्देशाने झालेली आहे. ती छोट्या किरकोळ कारणामुळे तुटणार नाही, असं स्पष्टीकरण खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.
दरम्यान, पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी काळ राहिला आहे. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना निवडणुकीचे तर नेतेमंडळी-आमदार-खासदारांना उमेदवारीचे वेध लागले आहेत. राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या आघाड्यांमध्ये आपापसांत जागावाटप नेमकं कसं होणार? यासंदर्भात बैठका सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे वेगवेगळ्या जागांसाठी काही ठिकाणी मित्रपक्षांमधलेच अनेक उमेदवार इच्छुक असल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.