डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाकडून महिला रुग्णाची हेळसांड, 2 तासानंतर मिळाली रुग्णवाहिका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 08:11 PM2022-09-20T20:11:57+5:302022-09-20T20:16:07+5:30
डोंबिवली पश्चिमेतील नेमाडे गल्लीत राहणाऱ्या सारिका मालाडकर या ६२ वर्षीय महिला मणक्याच्या आजाराने त्रस्त आहेत.
डोंबिवली - मणक्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या महिला रुग्णाला डी. वाय. पाटील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्याकरीता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाने दोन तास उशिराने रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्याने रुग्ण महिलेच्या मुलाला प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. या प्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी आयुक्तांकडे रुग्णालयाच्या मनमानी कारभाराविषयी तक्रार करुन अधिकारी वर्गाला धारेवर धरल्यावर दोन तासानंतर रुग्ण महिलेला रुग् वाहिका उपलब्ध झाली.
डोंबिवली पश्चिमेतील नेमाडे गल्लीत राहणाऱ्या सारिका मालाडकर या ६२ वर्षीय महिला मणक्याच्या आजाराने त्रस्त आहेत. त्या त्यांचा डावा पाय ही सुजला आहे. तसेच दररोज त्यांना सायंकाळी थंडी भरुन येते. त्याच्या उपचारासाठी त्यांचा मुलगा स्वप्नील याने शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी सारीका यांना पुढील उपचारासाठी डी. वाय. पाटील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. स्वप्नील हे देखील लिव्हरच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यांच्या आईला ताटकळत दोन तास प्रतिक्षा करावी लागली. रुग्णवाहिकेचे चालक अत्यंत वाईट वागणूक देत होते.
आईला रुग्णवाहिकेत उचलून नेण्यासाठी स्वप्नीलनेच चार माणसे शोधून आणावीत असा सल्ला त्याला दिला गेला. स्वप्नील हा आजारी असल्याने तो आईला उचलून रुग्णवाहिकेत नेऊ शकत नव्हता. त्याची हतबलता पाहून रुग्णवाहिका आणि प्रशासनाला दया आली नाही. हा प्रकार स्वप्नील याने शिवसेनेचे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्याकडे कथीत केला. तेव्हा राणे यांनी अधिकारी वर्गाची थेट तक्रार आयुक्तांकडे केली. तेव्हा आयुक्तांनी संबंधीतावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. रुग्णालय प्रशासनाकडून सुरू असलेल्या मनमानीला चाप लावा अशी मागणी राणे यांनी केली. तेव्हा कुठे दोन तासानंतर मालाडकर यांना रुग्णवाहिका उपलब्ध झाली. स्वप्नीलने आई सारिका हिला डी. वाय. पाटील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले आहे. रुग्णवाहिकेसाठी पाच हजार रुपये भाडे मोजावे लागले. तसेच अतिदक्षता विभागाचे दहा हजार आणि औषध गोळ्य़ांचे पाच हजार रुपये खर्च झाल्याचे स्वप्नीलने सांगितले.
घरची परिस्थिती बेताची
स्वप्नीलचे वडिलांचे २०१७ सालीच निधन झाले आहे.. त्यांच्या पश्चात पत्नी सारीका, मुलगा स्वप्नील आणि लहान बहीण आहे. स्वप्नीलच्या हाताला काम नाही. आईला वडिलांची पेन्शन मिळते. त्यावर त्यांचे घर चालते. त्यात आई आणि स्वप्नीलच्या उपचाराचा खर्च भागवावा लागतो.