समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी अमृत महोत्सव; तुषार गांधी यांची सरकारच्या धोरणावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 07:38 AM2022-03-09T07:38:35+5:302022-03-09T07:38:45+5:30

शहरातील बिर्ला महाविद्यालयातील गांधी अध्ययन केंद्रातर्फे ५ ते १२ मार्चदरम्यान युवा शिबिर घेण्यात आले. या शिबिरात देशभरातील विविध राज्यांतून युवा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

Amrut Mahotsav to divert attention from problems; Tushar Gandhi's criticism of the government's policy | समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी अमृत महोत्सव; तुषार गांधी यांची सरकारच्या धोरणावर टीका

समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी अमृत महोत्सव; तुषार गांधी यांची सरकारच्या धोरणावर टीका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. खरंच देश स्वतंत्र झाला आहे का? ७५ वर्षांनंतरही देशात आजही त्याच समस्या कायम आहेत. या समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा अमृतमहोत्सव साजरा केला जात असल्याचे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. 

शहरातील बिर्ला महाविद्यालयातील गांधी अध्ययन केंद्रातर्फे ५ ते १२ मार्चदरम्यान युवा शिबिर घेण्यात आले. या शिबिरात देशभरातील विविध राज्यांतून युवा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गांधी यांना आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, अविनाश पाटील आणि सुरेश हतीपूर्ण आदी मान्यवर उपस्थित होते. 

तुषार गांधी म्हणाले की, ‘गांधीजींच्या स्वप्नातील भारत निर्माण झाला का, तर त्याचे उत्तर नाही असे आहे. आजही देशात त्याच समस्या आहेत. आपण कालही गुलाम होतो. आजही गुलाम आहोत. उद्याही गुलामच राहणार. आपल्या देशात शैक्षणिक क्रांती घडविणे आवश्यक आहे. देशात जिथे रोजगार आहे, तिथे वास्तव्याची सोय नाही. जिथे वास्तव्याची सोय आणि सुरक्षा आहे, तिथे रोजगार नाही. ही स्थिती कोरोना काळात आपण आपल्या डोळ्यांदेखत पाहिली. कोरोनाकाळात लॉकडाऊनच्या काळात मजूर आपल्या गावी पलायन करीत होते, हे भयावह चित्र भारतात दिसले.’, असेही त्यांनी सांगितले. 

नोकरीचीही हमी नाही
गांधी म्हणाले की , महात्मा गांधी यांना जाणून घ्यायचे असेल तर महात्मा म्हणून नव्हे, तर मोहनदास म्हणून ते काय जगले हे आधी जाणून घ्यावे लागेल. तरच तुम्ही महात्मा गांधीजींना जाणून घेऊ शकता. उच्चशिक्षण घेऊनही आपल्या देशातील तरुणांच्या हाताला रोजगार नाही. नोकरीची हमी नाही. इंजिनिअर, डॉक्टर  यांना रोजगाराची शाश्वती नाही, तर तिथे अन्य तरुणांचे काय होत असेल. मात्र, देशाचे पंतप्रधान म्हणतात की, इंजिनिअर झाला; पण नोकरी नाही तर भजी तळा आणि ती विका. त्यांना भजीच तळायची होती, तर त्यांनी शिक्षणावर १७ वर्षे वाया का घालवायची, असा प्रश्न गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.

Web Title: Amrut Mahotsav to divert attention from problems; Tushar Gandhi's criticism of the government's policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.