अमृत योजना जलकुंभाच्या जागेचा प्रश्न सुटला; मनसे आमदारांच्या पाठपुराव्याला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 02:51 PM2022-01-06T14:51:43+5:302022-01-06T14:53:12+5:30
Kalyan-Dombivali : पाणी योजनेच्या कामाला गती देण्यासाठी मनसे आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
कल्याण : २७ गावांकरिता केंद्र सरकारच्या अमृत पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. गावात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. जलकुंभ उभारण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हत्या. या जागा जिल्हा परिषदेने कल्याणडोंबिवली महापालिकेस हस्तांतरीत करण्यात आल्याने जलकुंभ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा केला होता. याविषयी त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली होती.
२७ गावातील उसरघर, माणोरे, द्वारली, भोपर, देसलेपाडा, कोळे , संदप, निळजे, हेदुटणो या गावांमधील गुरु चरण, प्रांतिक सरकार इतर हक्क-परिवहन आयुक्त मुंबई यांचा आगाऊ ताबा, सार्वजनिक रस्ता, ग्रुप ग्रामपंचायत व प्रांतिक सरकार आदी प्रकारच्या जमिनींवर जलकुंभांचे आरक्षण होते. त्यामुळे या जमिनी जलकुंभासाठी महापालिकेकडे वर्ग करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यामुळे जलवाहिन्या टाकल्या तरी जलकुंभांची कामे अद्याप रखडली होती.
पाणी योजनेच्या कामाला गती देण्यासाठी मनसे आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच जलकुंभांसाठी आवश्यक असणार्या जागांची पाहणी देखील आमदार पाटील यांनी अधिकार्यांसोबत केली होती. जलकुंभाच्या जागेचा प्रश्न सुटल्याने जलकुंभ उभारण्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
२७ गावांना आजमितीस एमआयडीसीकडून ३० दश लक्ष लिटरपेक्षा जास्त पाणी पुरवठा केला जातो. या पाणी पुरवठ्याचे बिल महापालिका भरते. हा पाणी पुरवठा अपुरा आहे. तसेच कमी दाबाने होत असतो. त्यामुळे अनेकदा या गावात पाणी टंचाईच होते. त्यासाठी केंद्र सरकारने अमृत पाणी पुरवठा योजनेला मंजूरी दिली. ही योजना १९४ कोटी रुपये खर्चाची आहे. या योजने अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ उभारणे ही कामे केली जाणार आहे. ही कामे पूर्णत्वास झाल्यास २७ गावांचा पाणी प्रश्न निकाली निघणार आहे.