शिवमंदिराच्या अंगणात मैथिलीच्या निरागस सुरांचा अभिषेक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 09:10 AM2023-03-20T09:10:41+5:302023-03-20T09:10:59+5:30
शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये रविवारची पहाट सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकुर हिच्या निरागस सुरांनी मंगलमय झाली.
मयुरी चव्हाण-काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये रविवारची पहाट सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकुर ( Maithili Thakur ) हिच्या निरागस सुरांनी मंगलमय झाली. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात मैथिलीने आपल्या निरागस सुरांनी जणू काही शिव शंकराला स्वराभिषेकच केला. मैथिलीचे सादरीकरण ‘याचि डोळा याचि देही’ अनुभवण्यासाठी अंबरनाथ-उल्हासनगर परिसरातील रसिकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती.
भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या अभंगवाणीतील ‘माझे माहेर पंढरी’ या अभंगाने तिने तिच्या भक्तीगीतांच्या मैफलीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर ‘डिमिक डिमिक डमरू कर बाजे’, ‘शंकर तेरी जटा में बहती है गंगधारा’, ‘कैलास के निवासी’ अशी शिव शंकराची भजने तिने गायली. भोजपुरी भाषेतील ‘आज मिथिला नगरिया नेहाल सखियॉ’ हे भोजपुरी भाषेतील राम भजनाबरोबरच ‘तोडा है धनुष्य सीता से नाता जोडा है’, ‘नगरी आयोध्यासी’, ‘सजादो घरको गुलशनसा अवध में राम आये है’, ‘श्रीराम जानकी बैठे है मेरे सीने में’, राम सिया राम सिया राम जय जय राम ! अशी श्रीरामाची गीते तिने सादर केली.
त्याचबरोबर रसिकांकडून आलेली कृष्णगीतांची फर्माईश पूर्ण करण्यासाठी तिने ‘वृंदावन में जाने को जी चाहता है, राधे राधे को गाने को जी चाहता है’ गाणे गायले. ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘कानडा राजा पंढरीचा, 'मनी नाही भाव आणि देवा मला पाव ' ही मराठी भजनेही तिने सादर केली.
महिषासूर मर्दिनी आणि शिवतांडव स्तोत्र, ‘दमादम मस्त कलंदर’ अशी फर्माईशीनुसार विविध शैलीची गाणी गात तिने श्रोत्यांना दोन तास मंत्रमुग्ध केले. 'भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा' या गाण्यावर उपस्थित रसिकांनी ताल धरला. भक्तीगीतांच्या या मैफलीदरम्यान तिने सहजपणे श्रोत्यांशी संवादही साधला.अंबरनाथमध्ये प्राचीन शिवमंदिराच्या प्रांगणात भक्तीगीतांची मैफल सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मैथिली ठाकुरने यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे आभार मानले. तर पुन्हा एकदा अंबरनाथ मध्ये कार्यक्रम सादर करायला आवडेल असेही तिने आवर्जून नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"