मनसेला आणखी एक धक्का, इरफान शेख यांची मनसेला सोडचिठ्ठी, प्रदेश सचिव पदासह सदस्यत्वाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:44 PM2022-04-14T12:44:52+5:302022-04-14T12:46:57+5:30
MNS Politics: ठाणे येथील सभेतही ठाकरे हे आपल्या विधानावर ठाम राहील्याने कल्याणमधील नाराज झालेले पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी गुरूवारी मनसे प्रदेश सचिव आणि सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला.
कल्याण - गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि मदरशासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यात आणि अन्य शहरांमध्ये मुस्लिम पदाधिका-यांचे राजीनामा सत्र पहायला मिळाले असताना ठाणे येथील सभेतही ठाकरे हे आपल्या विधानावर ठाम राहील्याने कल्याणमधील नाराज झालेले पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी गुरूवारी मनसे प्रदेश सचिव आणि सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला.
गुढीपाडव्याच्या सभेनंतर शेख यांनी आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या, आज समाजाला कसे सामोरे जायचे, १६ वर्षाचा फ्लॅशबॅक आठवला आणि डोळयात पाणी आले अशी भावनिक पोस्ट सोशल मिडीयावर टाकली होती. पक्षातील मुस्लिम कार्यकर्ते आणि समाज प्रश्न विचारू लागला आहे की, मनसेची नेमकी भुमिका काय आहे, पक्षात नेमके काय चालले आहे याकडेही शेख यांनी लक्ष वेधले होते. दरम्यान ठाण्याच्या सभेतही राज यांनी पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उपस्थित करीत भोंगे काढण्यासाठी 3 मे ची डेडलाईन दिल्याने नाराज झालेल्या शेख यांनी गुरूवारी पक्षाचा राजीनामा राज ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे.
मी पक्ष स्थापनेपासून काम करत आहे. अनेक आंदोलनात सामील होऊन अनेक गुन्हे अंगावर घेतले. 2008 च्या मराठी पाटया आंदोलनात पोलिसांनी अटक केली अंग हिरवे निळे करेर्पयत मारहाण केली. त्यावेळी आपणच या जखमा विसरू नको, बाकी मी बघतो असे म्हणाला होतात. आता मात्र काय बघायला मिळत आहे. समाजात कुचंबणा दुसरीकडे पक्षात अस्थिर वातावरण आहे. १६ वर्षानंतर आपल्याला अजान, मशीद, मदरसे यांच्यावर अचानक संशय आला. आम्ही तुमच्या सोबत असताना तुम्ही आम्हाला या गोष्टी बोलला असतात तर याचा सोक्षमोक्ष केला गेला असता असे शेख यांनी राजीनामा पत्रात म्हंटले आहे. दरम्यान शेख यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील एक अभ्यासु व्यक्तिमत्व गमावल्याची चर्चा आहे.