चिंतेत भर! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 'त्या' रुग्णासोबत प्रवास करणारा आणखीन एक प्रवासी डोंबिवलीतील, दिल्ली ते मुंबई केला प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 04:11 PM2021-12-01T16:11:57+5:302021-12-01T16:12:24+5:30
या ३२ वर्षीय प्रवाशासोबत प्रवास करणारे तब्बल ४२ सह प्रवासी होते. त्याची यादी सरकारडून केडीएमसीला मिळाली आहे. हे ४२ प्रवासी ज्या महापालिकांच्या हद्दीत राहतात. त्या-त्या महापालिकांकडून त्यांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केला जाणार आहे.
कल्याण - दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेल्या 'त्या' प्रवाशामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाची झोप उडाली असतानाच, त्या प्रवाशासोबत दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास करणारा आणखीन एक प्रवासी डोंबिवलीतील असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान २३ नोव्हेंबर रोजी नायजेरियातून सहा प्रवासी डोंबिवलीत आल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीची धास्ती आणखीन वाढली आहे. मात्र, या सगळ्या परिस्थितीत नागरीकांनी घाबरून न जाता कोरोना नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागकडून करण्यात आले आहे.
त्या सह प्रवाशाचे वय ५० वर्षे असून, त्याची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. त्याच्या कोरोना टेस्टचे नमुने जीनोम सिक्वेसिंगसाठी मुंबईला पाठविले जाणार आहेत. या रुग्णाची प्रकृती स्थित असून त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. या ५० वर्षीय प्रवाशाने दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास केला आहे. मात्र केपटाऊन ते मुंबई, असा विमान प्रवास करणाऱ्या ३२ वर्षीय प्रवाशांचा जिनोम सिक्वेसिंगचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
या ३२ वर्षीय प्रवाशासोबत प्रवास करणारे तब्बल ४२ सह प्रवासी होते. त्याची यादी सरकारडून केडीएमसीला मिळाली आहे. हे ४२ प्रवासी ज्या महापालिकांच्या हद्दीत राहतात. त्या-त्या महापालिकांकडून त्यांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केला जाणार आहे. ४२ पैकी एक प्रवासी हा डोंबिवलीतील असून त्याने केवळ दिल्ली ते मुंबई प्रवास केला आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या साथ रोग नियंत्रण विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.
दरम्यान ओमायक्रॉन व्हेरीयंटच्या धर्तीवर सरकारने दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नागरीकांची टेस्टींग सुरु केली आहे. डोंबिवलीत २३ नोव्हेंबर रोजी नायजेरीया येथून सहा प्रवासी आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. या सहा प्रवाशांना महापालिकेने क्वारंटाईन केले आहे. या सहा जणांची कोरोना टेस्टींग करण्यात आली आहे. त्यांच्या कोरोना टेस्टचा अहवाल प्रतिक्षेत आहे.
नायजेरीयातून आलेल्या सहा प्रवाशांमुळे कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग अधिक सर्तक झाला आहे. या प्रवाशांच्या कुटुंबियांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. केपटाऊनहून आलेल्या त्या ३२ वर्षीय प्रवाशाच्या नायजेरियातून आलेल्या सहा प्रवाशाशी संबंध नाही. नायजेरीयातून आलेले सहा प्रवासी आणि तो ३२ वर्षीय प्रवासी यांचा प्रवास वेगवेगळा झालेला आहे.