धक्कादायक! जेलमधून सुटल्यावर पुन्हा एक हत्या; ७४ वर्षीय महिलेचा खून करून दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 20:52 IST2025-04-05T20:50:00+5:302025-04-05T20:52:44+5:30

कल्याणमध्ये एका आरोपीने तुरुंगातून सुटल्यानंतर आणखी एक हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Another murder after release from jail Murder of 74-year-old woman in Ambivali, jewellery stolen | धक्कादायक! जेलमधून सुटल्यावर पुन्हा एक हत्या; ७४ वर्षीय महिलेचा खून करून दागिने लंपास

धक्कादायक! जेलमधून सुटल्यावर पुन्हा एक हत्या; ७४ वर्षीय महिलेचा खून करून दागिने लंपास

कल्याणमध्ये तुरुंगातून सुटलेल्या एका आरोपीने पुन्हा एक हत्या केल्याचे समोर आले आहे. व्यवसायासाठी पैसे हवे होते म्हणून वृद्धेची हत्या केली. आरोपीने पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करत खून करून दागिने लंपास केल्याचे तपासात उघड झाले आहे. खडकपाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कल्याणच्या आंबिवली परिसरात राहणाऱ्या ७४ वर्षीय रंजना पाटकर यांची हत्या करून त्यांचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या गुन्हेगाराला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. चांद उर्फ अकबर शेख (३०) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून, तो यापूर्वीही हत्या प्रकरणात दोषी आढळून कारागृहात होता. चांगली वर्तणूक असल्यामुळे त्याला काही महिन्यांपूर्वी सुटका देण्यात आली होती.

धक्कादायक! आधी लव्ह मॅरेज, नंतर आणखी एक अफेअर; विरोध करणाऱ्याला सासूला संपवलं, सून फरार

जेलमधून सुटल्यानंतर तो आंबिवलीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. मात्र, मोमोज विक्रीसाठी व्यवसाय सुरू करायचा असल्याने पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने काही दिवस रंजना पाटकर यांच्या घराची रेकी केली. २० मार्च रोजी आरोपीने पाणी मागण्याच्या बहाण्याने वृद्धेच्या घरी प्रवेश केला. टीव्हीचा आवाज वाढवून त्याने आरडाओरडा ऐकू येऊ नये याची काळजी घेतली आणि नंतर महिलेचा गळा दाबून खून केला.

कुटुंबीयांनी दुसऱ्यावरती संशय व्यक्त केला

वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कर्णफुले मिळून सुमारे १.०५ लाखांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी मयतच्या कुटुंबीयांचा दुसऱ्यावरती संशय होता, त्यामुळे पोलिसांनी एक संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात हजर केले व सध्या तो कल्याण आधारवाडी जेलमध्ये आहे. मात्र, यादरम्यान पोलिसांनी परिसरात असलेल्या गुन्हेगारीवरती पाळण ठेवत १०० पेक्षा अधिक लोकांची माहिती गोळा केली.  पोलिसांच्या गुप्त माहितीदाराने दिलेल्या माहितीवरून खऱ्या आरोपीचा छडा लावण्यात आला. 

आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. ही हत्या आणि जबरी चोरी उघडकीस आणणाऱ्या खडकपाडा पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून, या गुन्ह्यातील तपास अधिक सुरु आहे. 

Web Title: Another murder after release from jail Murder of 74-year-old woman in Ambivali, jewellery stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.