रिपोर्ट येईपर्यंत तो झाला बरा; कल्याण- डोंबिवलीतील ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण उपचाराअंती घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 07:13 PM2021-12-17T19:13:33+5:302021-12-17T19:13:53+5:30
महापालिकेकडून लसीकरणाची मोहिम सुरु असताना सव्रेक्षणातून चार जणांचे एक कुटुंब नायजेरीयातून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागास मिळाली होती.
कल्याण- नायजेरीयातून आलेल्या प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी पॉझीटीव्ह आली होती. त्याला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्याचे नमुने जीनोम सिक्वेसिंगकरीता पाठविले होते. त्याला ओमायक्रॉनचा अहवाल आज आला आहे. रिपोर्ट उशिरा आला असला तरी दरम्यान रुग्णाची पुन्हा केलेली आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. मात्र त्याला पुढील सहा दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणो बंधनकारक आहे.
महापालिकेकडून लसीकरणाची मोहिम सुरु असताना सव्रेक्षणातून चार जणांचे एक कुटुंब नायजेरीयातून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागास मिळाली होती. 2 डिसेंबर रोजी चारही जणांनी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. 3 डिसेंबर रोजी चारही जणांना आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. या चार जणांमध्ये पती पत्नी आणि एक दहा वर्षाचा मुलगा व सहा वर्षाची मुलगी या चौघांचा समावेश होता. त्यापैकी पती पत्नीने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. चारही जणांना महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. ते लक्षण विरहीत होते. या चौघांचे नमुने जीनोम सिक्वेसिंगकरीता पाठविण्यात आले होते. त्यापैकी 45 वर्षीय रुग्णाचा ओमायक्रॉनचा अहवाल आज प्राप्त झाला. तो पॉझीटीव्ह आढळून आला. दरम्यान या रुग्णाची चौदा दिवसानंतर पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केली. चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. त्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले. त्याचा ओमायक्रॉनचा रिपोर्ट सायंकाळी पाच वाजता महापालिकेच्या आरोग्य विभागास प्राप्त झाला. घरी सोडण्यात आलेल्या रुग्णाला आणखीन सहा दिवस होम आयसोलेशनमध्ये राहण्याचे सांगण्यात आले आहे.
या कुटुंबाच्या 24 हाय रिस्क आणि 62 लो रिस्क कॉन्टॅक्ट महापालिकेने शोधन काढले. त्यापैकी चार जण निकट सहवासातील आहे. त्याची आरटीपीसीआर चाचणी केली असता तिचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. त्यांना महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थीर आहे. तसेच कुठल्याही प्रकारची लक्षणो नाहीत. नागरीकांनी घाबरून न जाता कोविड अनुरुप वर्तनाचा कटाक्षाने अवलंब करावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी केले आहे.