KDMCचा मोठा निर्णय! परराज्यातून कल्याण स्थानकावर येणाऱ्या नागरिकांना अँटीजेन टेस्ट बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 05:05 PM2021-05-20T17:05:40+5:302021-05-20T17:06:21+5:30
परराज्यातून कल्याण रेल्वे स्थानकावर येणारे नागरिक कोणत्याही प्रकारची कोविड टेस्ट न करताच शहरात दाखल होत आहेत. यामुळे आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
परराज्यातून कल्याण रेल्वे स्थानकावर येणारे नागरिक कोणत्याही प्रकारची कोविड टेस्ट न करताच शहरात दाखल होत आहेत. यामुळे आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर कल्याण स्टेशनवर दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची अँटिजेन टेस्ट बंधनकारक करण्याचे निर्देश केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. नागरिकांनी ॲन्टीजेन टेस्ट न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा विचार असल्याचेही संकेत सूर्यवंशी यांनी दिलेत. महापालिका आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गुरुवारी कल्याण रेल्वे स्थानकात आयोजिलेल्या पाहणी दौऱ्याच्या वेळी महापालिका आयुक्तांनी ही माहिती दिली.
11 एप्रिल रोजी 2400 पर्यंत गेलेली कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या आता 200 पर्यंत आलेली आहे, आपण कोरोनाची रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यास यशस्वी झालो आहोत पण परप्रांतातून विशेषतः युपी, बिहार, वेस्ट बंगाल येथे गेलेले नागरिक कल्याण रेल्वे स्थानकात परत येत असून त्यांच्याकडून कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असल्यामुळे रेल्वे प्रशासनासोबत पाहणी करून प्रत्येक नागरिकाचे टेस्टिंग कसे करता येईल याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच रेल्वे स्थानकावर आता 3 ते 4 ठिकाणी टेस्टिंग करण्याची व्यवस्था करण्यात येत असून त्यामधून प्रत्येक नागरिकाचे टेस्टिंग केले जाईल असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.
त्याचप्रमाणे ब्रेक द चेनच्या अंमलबजावणीसाठी रेल्वे प्रशासन पूर्णपणे सहकार्य करणार असून परराज्यातून कल्याण स्टेशनवर दाखल होणा-या प्रवाश्यांकडे आरटीपीसीआर किंवा अँन्टीजेन टेस्ट रिपोर्ट नसल्यास त्यांची ॲन्टीजेन टेस्ट करुनच त्यांना बाहेर सोडले जाईल, तसेच "माझे कुटूंब, माझी जबाबदारी" या मोहिमेच्या अनुषंगाने प्रत्येकाने चाचणी करुन घेणे आवश्यकच आहे, असे रेल्वे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधव यांनी सांगीतले