सकाळी अर्ज अन् सायंकाळपर्यंत घरात प्रकाश; कल्याण परिमंडलात चार दिवसांत २५ जणांना २४ तासांत नवीन वीजजोडणी
By अनिकेत घमंडी | Published: July 24, 2023 06:42 PM2023-07-24T18:42:44+5:302023-07-24T18:46:09+5:30
संततधार पावसातही गेल्या चार दिवसात २५ जणांना २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्याचे काम वीज कर्मचाऱ्यांनी केली.
डोंबिवली: महावितरणच्या कल्याण परिमंडलात नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करून सर्व प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांना अवघ्या २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्यात येत आहे. यात सकाळी मिळालेल्या अर्जावर सर्व सोपस्कार पूर्ण करून सायंकाळपर्यंत नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येत आहे. संततधार पावसातही गेल्या चार दिवसात २५ जणांना २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्याचे काम वीज कर्मचाऱ्यांनी केली.
उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमूख सेवा तत्परतेने पुरवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विविध उपाययोजना केल्या असून त्याचाच भाग म्हणून ग्राहकांना नवीन वीजजोडणी तत्परतेने देण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशाप्रमाणे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी कल्याण परिमंडलात सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या अर्जांवर शहरी भागात २४ तासांच्या आत तर ग्रामीण भागात ४८ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्याची मोहिम सुरू केली आहे.
या मोहिमेंतर्गत उल्हासनगर दोन विभाग कार्यालयातील तानाजी शाखेतील १८ तर नेताजी शाखा कार्यालयातील एक जणाला २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्यात आली. कल्याण पश्चिम विभागातील पारनाका शाखा दोन अंतर्गत एका व्हेईकल चार्जिंग स्टेशनला तसेच डोंबिवली विभागातील टिळकनगर आणि उमेशनगर शाखेतील प्रत्येकी एकाला २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्यात आली. यासह वसई, पालघर विभागात जोडणी करण्यात आली. ग्राहकांकडून आनंद व्यक्त अवघ्या एका दिवसात नवीन वीजजोडणी मिळत असल्याने ग्राहकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसत आहे. महावितरणच्या या तत्पर सेवेबद्दल ग्राहकांनी आनंद व्यक्त केला असून महावितरणचे आभार मानले आहेत.