अतिधोकादायक इमारतींच्या सर्व्हेक्षणासाठी केडीएमसीकडून विशेष पथकाची नियुक्ती
By मुरलीधर भवार | Published: October 10, 2023 11:19 PM2023-10-10T23:19:18+5:302023-10-10T23:19:55+5:30
जुन्या इमारती कोसळून होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी निर्णय
मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील जुन्याअतिधोकादायक इमारती कोसळुन होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या सर्व प्रभागात बांधकाम उपअभियंता, नगररचना विभागाचा सर्व्हेअर, मालमत्ता विभागाचा भाग लिपिक आणिअग्निशमन विभागाचा स्थानक आणि उपस्थानक अधिकारी यांचा अंतर्भाव असलेल्या एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
महापालिका हद्दीतील इमारती प्रथमदर्शनी अतिधोकादायक आहेत की नाहीत हे निश्चित करण्यासाठी तांत्रिक ज्ञान आणि कौशल्याची आवश्यकता असल्यामुळे प्रत्येक प्रभागनिहाय, संबंधित प्रभागातील अतिधोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण करुन अहवाल सादर करण्याकामी वरीलप्रमाणे पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथकाने तात्काळ कामकाजास सुरुवात करुन आपला एकत्रित अहवाल मुख्यालयात सादर करणेबाबत आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत.
या पथकाने दैनंदिन कामकाजाचा अहवाल त्याचदिवशी निदर्शनास आलेल्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीसह संबंधित प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांना रोज सायंकाळी पाठवायचा आहे. प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी पथकाकडून माहिती प्राप्त होताच नियमातील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी असे आदेशात म्हटले आहे.