दारूच्या पार्टीत वाद; दगडाने प्रहार करून हत्या, तिघांपैकी दोघांना अटक
By प्रशांत माने | Published: November 28, 2023 06:34 PM2023-11-28T18:34:55+5:302023-11-28T18:35:08+5:30
दारूच्या पार्टीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादात तिघांनी एकाची दगडाने प्रहार करून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
डोंबिवली : पश्चिमेकडील सत्यवान चौक नजीक असलेल्या खाडी किनारी स्मशानभुमीच्या मागे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह डोक्यावर वार केलेल्या अवस्थेत सोमवारी आढळुन आला होता. दरम्यान या हत्येचे गुढ २४ तासाच्या आत उलगडण्यात विष्णुनगर पोलिसांना यश आले आहे. दारूच्या पार्टीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादात तिघांनी एकाची दगडाने प्रहार करून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. तिघांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.
सोमनाथ शिंदे (वय ४४ ) असे मृत व्यक्तीचे नाव असून हाताला मिळेल ते काम करणारे सोमनाथ हे महात्मा फुलेनगर येथे वास्तव्यास होते. कधी बिगारीचे तर कधी रिक्षा चालविण्याचे काम करणा-या सोमनाथची रिक्षा चालविणा-या योगेश डोंगरे (वय ४३), विलन टावरे ( वय ४१) आणि दिपक करकडे अशा तिघांची ओळख होती. त्यांच्यात अधूनमधून दारूपार्टी देखील व्हायची. शनिवारी रात्री दहा वाजता त्यांच्यात दारूपार्टी झाली. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. सर्वजण खाडीकिनारी गेले आणि यातील तिघांनी सोमनाथच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून त्याला गंभीर जखमी केले आणि तेथून तिघे निघून गेले.
जखमी अवस्थेतील सोमनाथचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या गुन्हयाच्या तपासकामी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे आणि वरीष्ठ पोलिस निरिक्षक मोहन खांदारे यांच्या मार्गदर्शनाखाली मृत व्यक्तिची ओळख पटविणे, सीसीटिव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपास करणे, गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळविणे, आजुबाजुच्या पोलिस ठाण्याच्या मिसींग तक्रार दाखल आहे का? आदिंचा शोध घेणेकामी पोलिस उपनिरिक्षक दिपविजय भवर, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक रूषीकेश सपकाळ, पोलिस हवालदार मनसब पठाण, हवालदार शकील जमादार, राजेंद्र पाटणकर, राजेश पाटील, नितीन भोसले, निसार पिंजारी, प्रशांत दिवटे, पोलिस शिपाई शशिकांत रायसिंग यांची विशेष पथके नेमण्यात आली होती. दरम्यान तीन आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. योगेश डोंगरे आणि विलन टावरे अशी अटक आरोपींची नावे आहेत तर दिपक करकडे या आरोपीचा शोध चालू आहे. अटक आरोपींना बुधवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.