सैनिकाला व त्याच्या कुटुंबाला सैन्य कधीच वाऱ्यावर सोडत नाही : अनुराधा गोरे
By अनिकेत घमंडी | Published: May 27, 2024 01:02 PM2024-05-27T13:02:30+5:302024-05-27T13:03:27+5:30
भाषाप्रभु राम गणेश गडकरी कट्टा कल्याणच्या वतीने नाटककार गडकरी व स्वा. सावरकर जयंती कार्यक्रम संपन्न
अनिकेत घमंडी, डोंबिवली: केवळ बंदूक चालवणाराच सैन्यात काम करू शकतो असे नाही तर सर्व कौशल्य असणारे डॉक्टर, इंजिनिअर, विविध विषयातील तज्ञ यांना सैन्यात काम करता येते. सैनिकाला व त्याच्या कुटुंबाला सैन्य कधीच वाऱ्यावर सोडत नाही. आपला पहिला प्रेफरन्स हा सैन्य असायला हवा असे आवाहन अनुराधा गोरे यांनी केले.
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाजवळ भगवा तलाव कल्याण येथे दोन दिवसीय झालेल्या कार्यक्रमात वीरमाता गोरे यांनी सैन्यापुढील आव्हाने व सैन्यातील संधी" या विषयावर मार्गदर्शन केले. इतिहासापासून धडा घेवून प्रत्येकाने सैनिकी शिक्षण घेणे आवश्यक आहे, आपल्या पुढील पीढीला तयार करा असे त्यांनी आवाहन केले. नाट्य दिग्दर्शक अशोक समेळ यांनी गडकरींच्या नाटकातील सौंदर्यस्थळे या विषयावर रसिकांना मंत्रमुग्ध केले. अनेक नाटकांतील स्वगते त्यांनी साभिनय सादर केली. पुण्याच्या संभाजीपार्क मध्ये पुन्हा राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसविण्यात यावा यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले. त्याच बरोबर श्रोत्यांशी नाटक व त्यांच्या अश्वत्थामा या पुस्तकावर चर्चा केली व नाटकासाठी प्रेक्षक घडविण्याचे आवाहन केले.
पहिल्या दिवसाचे सूत्रसंचालन रत्ना हिले यांनी तर दुसर्या दिवसाचे सूत्रसंचालन योगेश बुडुक यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कट्ट्याचे अध्यक्ष तुषार राजे, पुरूषोत्तम फडणीस, प्रवीण देशमुख, मेघन गुप्ते, दिलीप अग्रवाल, प्रसन्न कापसे, अनुश्री फडणीस, यांनी मेहनत घेतली. तसेच प्रा. मुकुंद बापटसर, दीपक देशपांडे व नवीन राजे यांचेही कार्यक्रमाला सहकार्य लाभले.