चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांपैकी एकाची धरपकड, कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
By प्रशांत माने | Published: December 20, 2023 12:21 PM2023-12-20T12:21:27+5:302023-12-20T12:22:51+5:30
यातील सनी तुसाबंड या आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत अटक करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे.
डोंबिवली : येथील पूर्वेकडील शेलारनाका चौकात अक्षय अहिरे आणि सनी तुसाबंड यांनी रणजित गलांडे यांना चाकूच्या धाकाने मारहाण करीत त्यांच्याकडील मोबाइल हिसकावला आणि त्याच्या बँक खात्यातून १२ हजार रुपये स्वत:च्या बँक खात्यात वळते केल्याची घटना गेल्या मंगळवारी घडली होती. दरम्यान यातील सनी तुसाबंड या आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत अटक करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे.
चिल्लाया तो काट डालेंगे. कोणी मध्ये आले तर एकेकाला कापून टाकीन, अशी धमकी देत शेलारनाका चौकात दहशत माजविण्याचा प्रकार दोघा आरोपींनी केला होता. या लुटमारीची तक्रार सोमवारी रामनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. दरम्यान, गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही सुरू होता.
येथील पोलिस हवालदार विश्वास माने आणि गुरुनाथ जरग यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार वरीष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार, पोलिस निरिक्षक राहुल मस्के, सहायक पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक संजय माळी, हवालदार माने, जरग, बापुराव जाधव, गोरक्ष शेकडे यांच्या पथकाने पश्चिमेकडील बावनचाळ परिसरात सापळा लावून सनी तुसाबंड (वय १९) याला अटक केली. तुसाबंड हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याला रामनगर पोलिसांच्या हवाली केले गेले आहे. दुसरा आरोपी अक्षय हा अद्याप फरार आहे.