दोन देशी बनावटीचे पिस्तुल आणि चार काडतुस बाळगणारा गजाआड; कल्याण गुन्हे शाखेची कारवाई
By प्रशांत माने | Published: November 18, 2024 09:50 PM2024-11-18T21:50:01+5:302024-11-18T21:50:17+5:30
कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सापळा लावून अटक केली.
प्रशांत माने, डोंबिवली: दोन देशी बनावटीची पिस्तुल आणि चार जिवंत काडतुस बेकायदेशीररित्या बाळगणा-याला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सापळा लावून अटक केली. सुधीर रामनिवास ठाकुर ( वय २२) रा. उत्तरप्रदेश असे अटक आरोपीचे नाव आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील बावनचाळ परिसरातील गणेश मंदिर जवळ एकजण देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस शिपाई मिथुन राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष उगलमुगले, पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलिस कर्मचारी अनुप कामत, किशोर पाटील, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विलास कडु आदिंनी सोमवारी सकाळी बावनचाळीतील गणेश मंदिर परिसरात सापळा लावला.
बातमीदाराने दिलेल्या वर्णनानुसार एक व्यक्ती त्याठिकाणी आला असता पथकाने लागलीच त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्तुल आणि चार जिवंत काडतुस असा एकुण ९४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल आढळुन आला. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन निवडणुकीची धामधुम सुरू असताना देशी बनावटीची पिस्तुलं कोणाला विक्री करण्यासाठी आला होता याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे.