लेख: उद्धव ठाकरेंना चकविण्यासाठी शिवसेना-भाजपामध्ये लुटुपुटूची लढाई?

By अजित मांडके | Published: June 12, 2023 10:09 AM2023-06-12T10:09:11+5:302023-06-12T10:09:29+5:30

शिवसेना-भाजप युती आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचा दावा वरिष्ठ पातळीवरून केला जात आहे. त्याचवेळी कल्याण-ठाण्यात युतीतील मित्रपक्षांतच संघर्ष पेटला आहे.

Article on Is Shiv Sena and BJP pretending war to deceive Uddhav Thackeray | लेख: उद्धव ठाकरेंना चकविण्यासाठी शिवसेना-भाजपामध्ये लुटुपुटूची लढाई?

लेख: उद्धव ठाकरेंना चकविण्यासाठी शिवसेना-भाजपामध्ये लुटुपुटूची लढाई?

googlenewsNext

अजित मांडके, प्रतिनिधी

शिवसेना-भाजप युती आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचा दावा वरिष्ठ पातळीवरून केला जात आहे. त्याचवेळी कल्याण-ठाण्यात युतीतील मित्रपक्षांतच संघर्ष पेटला आहे. भाजपचे कोकण पट्ट्यातील नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हे शिवसेनेबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचवेळी त्यांच्या उपस्थितीत कल्याण लाेकसभा निवडणुकीत शिवसेनेला मदत करणार नाही, असा ठराव करण्याइतकी टाेकाची भूमिका भाजपने घेतली आहे. त्याला निमित्त जरी कल्याणमधील विकासकामांच्या फलकांवरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चव्हाण यांचे फोटो वगळण्याचे असले तरी अशा कारणावरून एवढे नाराज होणाऱ्या नेत्यांसारखे चव्हाण नाहीत. त्यातही भाजपचे नेते नंदू जोशी यांच्यावर दाखल गुन्ह्याचे कारण पुढे केले जात असले तरी गृहखाते भाजपकडेच आहे. निधी मिळण्याचा प्रश्न असेल तर समान वाटा मिळण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद भाजपच्या ताब्यात आहे. शिवाय शिंदे-चव्हाण यांच्यात थेट संघर्ष उभा ठाकल्याचे दिसलेले नाही. उलट राज्यात सत्तांतर झाले तेव्हा मुंबई ते सुरत, सुरत ते गुवाहाटी या प्रवासात चव्हाण हेच शिंदे यांना अखंड सोबत करत होते.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण मतदारसंघाच्या सतत केलेल्या दौऱ्यानंतरही शिंदे यांनी फारशी खळखळ केलेली नव्हती. पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात क्लस्टरचे भूमिपूजन झाले, तेव्हा रवींद्र चव्हाण यांनी तेथून अवघ्या दोन मिनिटांतच काढता पाय घेतला हाेता. त्यामुळे भाजपमधील नाराजी अचानक उफाळून येण्याचे कारण काय, असा प्रश्न उभा राहतो. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गाफील ठेवण्यासाठी ही रणनीती असू शकते, असा सूरही लावला जात आहे. महाविकास आघाडीतही तिन्ही पक्ष अनेकदा परस्परांशी जाहीर संघर्ष करताना दिसतात; पण रिझल्ट देताना ते एकत्र असतात. तसेच पाऊल उचलण्याच्या डावपेचांचा हा भाग असू शकतो किंवा कल्याणमध्ये दबाव वाढवला, तर किमान ठाणे लोकसभा तरी पदरात पडेल, यासाठी युती अंतर्गत ही राजकीय खेळीही असू शकते, असे काहींना वाटते.

ठाण्यात राजन विचारे यांना साथ देण्याची तयारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केली आहे. कल्याण लोकसभेसाठी आगरी कार्ड खेळण्याचा विचार ठाकरे गटाकडून सुरू असल्याचे मानले जाते. कदाचित त्यांच्यावरचा फाेकस हटवण्यासाठी शिवसेना, भाजपची ही खेळी नाही ना?

ठाणे, कल्याण लोकसभेसाठी भाजपने स्थानिक पातळीवर जोर लावताना फक्त कल्याणच नव्हे, ठाणेही आमचेच अशा घोषणा केल्या आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही बैठक बोलावल्याने हे खरोखरीच कुरघोडीचे राजकारण आहे, की इतर पक्षांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न अशी चर्चाही सुरू आहे.

...तर मिशन कल्याण अवघड हाेऊ शकते

कल्याण लोकसभेवरून तापलेले राजकारण ही वस्तुस्थिती असेल तर भविष्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. चव्हाण यांनी असहकार कायम ठेवला, तर भाजपचे प्राबल्य असलेल्या डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर या विधानसभा मतदारसंघांत मतांचे विभाजन होऊ शकते. कळवा-मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत शिंदे यांचे सुरुवातीला चांगले संबंध होते. मात्र सध्या त्यात वितुष्ट आले. कल्याण ग्रामीणमध्ये मात्र राजू पाटील यांच्याशी त्यांचे संबंध सुधारलेले दिसतात. पण भाजपच्या नाराजीचा परिणाम श्रीकांत शिंदे यांच्या मतांवर होऊ शकताे. त्यामुळे मिशन कल्याण अवघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Article on Is Shiv Sena and BJP pretending war to deceive Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.