मला फार लवकर मोठी माणसे भेटल्याने मी लिखाण करू शकलो : अच्युत गोडबोले
By अनिकेत घमंडी | Published: January 13, 2024 03:03 PM2024-01-13T15:03:22+5:302024-01-13T15:04:18+5:30
गोडबोले स्वामी विवेकानंद पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पुरस्काराचा रौप्य महोत्सवी वर्षाचा सोहळा
डोंबिवली: मला फार लवकर मोठी माणसं भेटली यामुळे मी एवढे लिखाण करू शकलो या लिखाणामुळेच मला हा पुरस्कार मिळाला आहे. माणसाने प्रत्येक गोष्टीवर का हा प्रश्न विचारला म्हणून विज्ञानाची निर्मिती झाली. मानवाने विज्ञान आयुष्यात वापरायला सुरुवात केली त्यातून तंत्रज्ञान निर्माण झाले. हेच तंत्रज्ञान आता प्रगत होऊन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे प्रतिपादन प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले यांनी केले. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सवी स्वामी विवेकानंद पुरस्कार गोडबोले यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्या हस्ते शुक्रवारी स्वामी विवेकानंद शाळेच्या दत्तनगर शाखेत प्रदान करण्यात आला.
शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे त्याचे स्वरूप होते. हा पुरस्कार दरवर्षी स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने देण्यात येतो. त्यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष संजय कुलकर्णी ,उपाध्यक्ष विद्याधर शास्त्री,कार्यवाह शिरिष फडके , सहकार्यवाह प्रमोद उंटवाले, कोषाध्यक्ष अमित भावे उपस्थित होते. हा पुरस्कार सोहळा संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, छत्रपती भवन, आयरे रोड, दत्तनगर येथे पार पडला.
स्वामी विवेकानंद पुरस्कार स्विकारल्यानंतर गोडबोले मार्गदर्शन करतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले।की, राष्ट्रीय शिक्षण संस्थेतील वातावरणाने भारावून गेलो. लहानपणीच्या आठवणीने उजाळा देत गणित विषयातील आवडीमुळे उदाहरणे तीन तीन प्रकारे सोडवली . त्याचबरोबर घरी विविध साहित्यिकांचे येणे जाणे असल्याने लेखक होऊ शकलो. व मराठी भाषेमध्ये लिखाण केल्याचे म्हटले. कृत्रिम बुद्धिमत्ता पुढील काही वर्षात एवढी वाढणार आहे की निर्माता व ग्राहक यामध्ये सरळ संवाद होईल मध्यस्थीची भूमिका राहणार नाही. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नोकरी कपात होईल. कामाचे स्वरूप देखील बदलत जाईल. त्याचप्रमाणे कामासाठी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. तंत्रज्ञान हे झपाट्याने बदलत असल्याने आपण तज्ञ होण्याची गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलकर्णी यांनी केले. संस्था ही ठाणे जिल्ह्यात आपल्या शहराचे नेतृत्व करीत असून येथील विद्यार्थी विविध कला क्रीडा तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तमोत्तम काम करीत आहेत असे म्हटले. सत्कारमूर्तींचा परिचय संस्था सदस्य राजाराम पाटील यांनी करून दिला. सत्कारमूर्तींना देण्यात आलेल्या मानपत्रचे वाचन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरुणोदय माध्यमिक शाळेचे शिक्षक डॉ. सुनील पांचाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील शिक्षिका मेधा कांबळी यांनी केले.आभार सहकार्यवाह प्रमोद उंटवाले यांनी मानले. यावेळी गेल्या २४वर्षात विविध मान्यवरांना दिलेले स्वामी विवेकानंद पुरस्कार चित्रफित सादरीकरणाद्वारे दाखवण्यात आले. पुरस्काराच्या सुरुवातीला विष्णुनगर प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांनी शारदे वंदन तव पायी" हे ईशस्तवन तर विष्णुनगर मध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भ्रमर गुंजले रसिक रंगले" हे स्वागत गीत सादर केले. .तसेच विष्णुनगर माध्यमिक शाळेतील विद्यार्थी तुषार योगेश देशमुख याने कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण वंदे मातरम् म्हटले.
त्याचबरोबर संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या डॉ. रघुनाथ माशेलकर बालवैज्ञानिक पुरस्कारांची घोषणा कार्यवाह शिरीष फडके यांनी केली. यामध्ये प्राथमिक विभागाचा पुरस्कार रामचंद्रनगर इंग्रजी माध्यम मधील विद्यार्थीनी समिक्षा घनश्याम मोरे हिला तर माध्यमिक विभागाचा पुरस्कार विष्णुनगर शाळेचा विद्यार्थी मयुरेश वाल्मीक आसने यांनी मिळविला. यावेळी अरुणोदय माध्यमिक शाळेने अंतराळ यानाची प्रतिकृती तयार करून तिचे प्रक्षेपण दाखवणारा प्रकल्प साकारला होता . याची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका सविता मगर , रामचंद्र नगर शाळेच्या मुख्याध्यापका व पुरस्कार सोहळा व्यवस्था प्रमुख सौ. उर्मिला चव्हाण व शिक्षक रवींद्र पवार यांची होती,तसेच यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग होता.