खोके बंद झाल्याने खोक्याचा जप सुरू, डॉ. श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 06:37 AM2023-06-18T06:37:09+5:302023-06-18T06:37:20+5:30
कल्याण आणि भिवंडी येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शनिवारी अत्रे रंगमंदिरात केले होेते. यावेळी खासदार शिंदे यांनी ही टीका केली.
कल्याण : ‘आधी खाेके यायचे, ते येणे बंद झाल्यानेच आता खाेक्यांचा जप केला जात आहे,’ अशी टीका कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. कल्याण आणि भिवंडी येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शनिवारी अत्रे रंगमंदिरात केले होेते. यावेळी खासदार शिंदे यांनी ही टीका केली. आमदार विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, शहरप्रमुख रवी पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ ते २० तास अहोरात्र काम करून संघटना वाढविली. पक्ष संघटना वाढविण्यासाठी त्यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे. त्यांच्यामुळे राज्यातील विकासकामांना मोठा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. अडीच वर्षे विकासकामे ठप्प होती. ११ महिन्यांत विद्यमान सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली आहे,’ असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
‘लोकांना विकास हवा हाेता. मात्र, ते नाइट लाइफ देण्यावर ठाम होेते,’ अशी टीका शिंदे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर केली. ‘कोरोना काळात युवराजांना भेटण्यासाठी गेलो, तेव्हा कोराेना किट घेऊन आले. कोराेना टेस्ट निगेटिव्ह आल्यावर ते आम्हाला भेटले.’ हा किस्सा सांगून युवराजांची भेट होणे किती अवघड होते, यावर शिंदे यांनी लक्ष वेधले.
‘लावालाव्या करण्याचे काम’
शिवसेना-भाजप युतीत मनोमिलन झाले का? असा सवाल खासदार शिंदे यांना विचारला असता, त्यांनी सांगितले की, ही युती एका वेगळ्या विचारांनी झालेली आहे. युतीत छोट्या कारणांमुळे वित्तुष्ट येणार नाही. विरोधकांना काही काम उरलेले नाही. त्यांचा दिवस लावालाव्या करण्यात जातो. १९ जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. तो साजरा करण्यासाठी शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे.