आशा स्वयंसेविकांचे मानधनाच्या फरकाच्या रक्कमेसह वाढीव मानधन मिळालेच नाही, केडीएमसीवर आशा स्वयंसेविकांचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 03:55 PM2021-10-20T15:55:31+5:302021-10-20T15:55:38+5:30
KDMC News: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील १५१ आशा स्वयंसेविकांना मानधनाच्या फरकाची रक्कम आणि वाढीव मानधन दिले गेले नाही. या मागणीसाठी आशा स्वयंसेविकांनी आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.
कल्याण - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील १५१ आशा स्वयंसेविकांना मानधनाच्या फरकाची रक्कम आणि वाढीव मानधन दिले गेले नाही. या मागणीसाठी आशा स्वयंसेविकांनी आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.
आशा स्वयंसेविका कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष भगवान दवणे यांनी आशा स्वयंसेविकांच्या शिष्टमंडळासह या मागणीसाठी महापालिकेच्य मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांनी भेट घेतली. यावेळी डॉ. पाटील यांनी फरकाच्या रक्कमेविषयी लवकर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती उपाध्यक्ष दवणे यांनी दिली आहे.
केंद्र सरकारकडून आशा स्वयंसेविका दोन हजार रुपयांचे मानधन दिले जाते. त्यापैकी केवळ १६५० रुपये आशा स्वयंसेविकाना दिले जातात. ३५० रुपये कापून घेतले जातात. कोरोना काळात आशा स्वयंसेविकांना जीवाची पर्वान करता काम केले आहे. ३५० रुपये थकबाकीसह मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्य सरकारने आशा स्वयंसेविका यांना २ हजार रुपये आणि गटप्रवर्तकाना ३ हजार रुपये मानधन वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम मार्च २०२१ र्पयत दिली गेली. मात्र एप्रिल २०२१ पासून आजर्पयत वाढीव मानधन दिले गेलेले नही. याशिवाय केंद्र सरकारने गटप्रवर्तकांच्या मानधनात १२०० रुपये तर आशा स्वयंसेविकांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ केली आहे. तसेच कोरोना महामारीत काम केल्याने गटप्रवर्तक आणि स्वयंसेविकांना प्रत्येकी पाचशे रुपये कोरोना भत्ता द्यावा असे मान्य केले आहे. ही रक्कम ही अद्याप त्यांना देण्यात आलेली नाही. या सगळया रखडलेल्या मानधनाची रक्कम फरकासह देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मोबाईल रिचार्जची रक्कमही आशा स्वयंसेविकांना दिली गेलेली नाही.
याशिवाय महापालिका कर्मचारी आणि परिवहनचे कामगार यांना दरवर्षी दिवाळी भेट अनुदान जाहिर करते. गतवर्षी महापालिकेच्या कामगारांसह परिवहन कर्मचा:याना प्रत्येकी १५ हजार रुपये दिवाळी भेट दिली गेली होती. आशा स्वयंसेविकांनीही कोरोना काळात काम केले आहे. त्यांना महापालिकेने प्रत्येकी २ हजार रुपयांची दिवाळी भेट देऊन त्यांची दिवाळी गोड केली होती. यंदा त्यात वाढ करून प्रत्येकी १० हजार रुपये दिवाळी भेट दिली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.