केडीएमसीतील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना प्रथमच ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर
By मुरलीधर भवार | Published: November 6, 2023 08:13 PM2023-11-06T20:13:24+5:302023-11-06T20:13:42+5:30
महानगरपालिकेच्या वर्ग-१ आणि २ च्या अधिकारी वर्गास तसेच वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचारी वर्गास १८ हजार रुपये सानुग्रह अनुदान यावर्षी देण्याचे जाहिर करण्यात आले आहे.
कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सध्या कार्यरत असलेल्या ३७० आशा स्वयंसेविका आणि २ आशा गट प्रवर्तक यांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यास महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज मंजूरी दिली आहे. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना प्रथमतः सनुग्रह अनुदान प्राप्त होणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे. काही दिवसापूर्वीच आशा स्वयंसेविकांच्या संघटनेच्या वतीने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढून दिवाळीत सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यांची मागणी विचारात घेऊन आयक्तांनी हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड होणार आहे. महानगरपालिकेच्या वर्ग-१ आणि २ च्या अधिकारी वर्गास तसेच वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचारी वर्गास १८ हजार रुपये सानुग्रह अनुदान यावर्षी देण्याचे जाहिर करण्यात आले आहे. हे अनुदान मंजूर करण्याची मागणी विविध कामगार संघटनांनी केली होती. तसेच कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यानी या संदर्भात आयुक्तांशी मोबाईल का’ल द्वारे संपर्क साधून वाढीव बोनस देण्याची मागणी केली होती. त्यांची सूचना विचारात घेऊन आयुक्तांनी हे निर्णय घेतल्याने आज शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक प्रभूनाथ भोईर यांच्यासह गणेश जाधव यांनी महापालिका मुख्यालयाबाहेर ढोलताशे वाजवित आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत करीत आनंद व्यक्त केला.