कंत्राट दुसऱ्याला दिल्याच्या रागातून कंपनी मॅनेजरवर प्राणघातक हल्ला; मास्टरमाईंडसह अन्य तिघांना अटक
By प्रशांत माने | Published: March 5, 2023 01:37 PM2023-03-05T13:37:21+5:302023-03-05T13:37:45+5:30
फर्निचरच्या कामाचे कंत्राट दुस-याला दिल्याच्या रागातून एकाने इतरांच्या मदतीने कंपनीच्या मॅनेजरवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना येथील एमआयडीसी, म्हात्रेनगर परिसरात फेब्रुवारी महिन्यात घडली होती.
डोंबिवली: फर्निचरच्या कामाचे कंत्राट दुस-याला दिल्याच्या रागातून एकाने इतरांच्या मदतीने कंपनीच्या मॅनेजरवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना येथील एमआयडीसी, म्हात्रेनगर परिसरात फेब्रुवारी महिन्यात घडली होती. या प्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सीसीटिव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हल्ल्याप्रकरणातील मास्टरमाईंडसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. मुख्य आरोपी पंकज पाटील, शैलेश राठोड, सुशांत जाधव आणि महेश कांबळे अशी आरोपींची नावे आहेत.
सुरेंद्र मौर्या हे एमआयडीसीमधील एका कंपनीत मॅनेजर आहेत. ते १५ फेब्रुवारीला संध्याकाळी कंपनीतून सुटल्यावर दुचाकीने घरी जात होते. त्यांची गाडी म्हात्रेनगर परिसरात आली असता अचानक पाठिमागून आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तिंनी त्यांची दुचाकी थांबवत त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. मौर्या यांना जखमी करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात मौर्या यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता.
या गुन्हयाचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग देखील करीत होते. वरीष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक मोहन कळमकर, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, पोलिस हवालदार विश्वास माने, प्रशांत वानखेडे, अनुप कामत, बापुराव जाधव, बालाजी शिंदे, प्रकाश इदे, विलास कडु, किशोर पाटील, पोलिस नाईक सचिन वानखेडे, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, अमोल बोरकर आदिंचे पथक तपास करीत होते. दरम्यान पोलिस हवालदार विश्वास माने आणि पोलिस नाईक गुरूनाथ जरग यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीनुसार हल्लाप्रकरणातील चौघांना सोनारपाडा येथे सापळा लावून अटक केली.
हल्लेखोरांवर लुटमार, मारहाणीचे गुन्हे
चौघा आरोपींविरोधात लुटमारी, दरोडयाची पूर्वतयारी, विनयभंग, मारहाण असे गुन्हे दाखल आहेत. पंकजवर तीन, सुशांतवर पाच, शैलेश विरोधात चार तर महेश विरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. नारपोली, मानपाडा, कोळसेवाडी, धारावी, नागपाडा पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत. आरोपी पंकजला फर्निचरचे कंत्राट मिळाले होते. परंतू त्याचे कंत्राट कमी करून ते इतर कंत्राटदाराला दिले या रागातून पंकज आणि शैलेश यांच्या सांगण्यावरून सुशांत आणि महेशने मौर्या यांच्यावर हल्ला केल्याची माहीती चौकशीत समोर आल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाठ यांनी दिली.