...त्यावेळी आमदारांकडील मोबाइल काढून घेतले होते, टीव्हीसुद्धा पाहू दिला नव्हता- रवींद्र चव्हाण

By अनिकेत घमंडी | Published: June 21, 2023 06:25 AM2023-06-21T06:25:16+5:302023-06-21T06:26:09+5:30

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला बंडाच्या वर्षपूर्तीच्या आठवणींना उजाळा

...At that time, MLAs' mobile phones were taken away, they were not even allowed to watch TV - Minister Ravindra Chavan recalled the memories of the anniversary of the rebellion. | ...त्यावेळी आमदारांकडील मोबाइल काढून घेतले होते, टीव्हीसुद्धा पाहू दिला नव्हता- रवींद्र चव्हाण

...त्यावेळी आमदारांकडील मोबाइल काढून घेतले होते, टीव्हीसुद्धा पाहू दिला नव्हता- रवींद्र चव्हाण

googlenewsNext

डोंबिवली : सुरतला गेल्यानंतर आमदारांकडील मोबाइल काढून घेतले होते. त्यांना टीव्हीही पाहू दिला नव्हता. गुवाहाटीला पोहोचल्यावरच आमदारांना टीव्ही बघायला परवानगी दिली गेली. घरच्यांसोबत संपर्क साधण्याची परवानगी दिली. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये एक छोटी चूक झाली असती, तरी हे ऑपरेशन सपशेल अपयशी ठरले असते. देशभर भाजपची नाचक्की झाली असती, असे सांगत सुरत ते गुवाहाटी बंडाच्या वर्षपूर्तीच्या आठवणींना उजाळा दिला, त्या मोहिमेत प्रमुख जबाबदारी पार पाडलेल्या सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनीे.

भारताच्या राजकारणात सर्वाधिक आमदार फुटीचा वेगळा इतिहास घडवून वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन झाले. चव्हाण यांनी ऑपरेशन लोटसमधील काही गुपिते उघड केली. ते म्हणाले, दिल्लीतील नेत्यांनी महाराष्ट्रात अशा पद्धतीने ऑपरेशन लोटसचे तीन वेळा प्रयत्न केले. २०१९ मध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील काही आमदार यांना एकत्र करून उठावाचे नियोजन झाले होते. पण, तांत्रिक अडथळा आल्याने तो प्रयत्न फसला. त्यानंतर कोविड आला. २०२१ दरम्यान प्रयत्न झाला. पण, वरिष्ठांनी हिरवा कंदील न दाखविल्यामुळे थांबला. अखेर २०२२चा जून महिना ठरला. पक्के नियोजन झाले आणि ते यशस्वी झाले.

त्याचे नियोजन हा अविस्मरणीय अनुभवांचा खजिना असून, सगळे काही सांगता येणे शक्य नाही, असेही चव्हाण म्हणाले.  सुरुवातीपासून ४० जण सोबत होतेच, पण ते टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्याचे नियोजन करण्यात आले होते, जे घडले, ते सगळे दिल्ली पातळीवरून घडले. त्याचे मार्गदर्शक फडणवीस होते. यांच्याच नियोजनानुसार हे ऑपरेशन पार पडले. मविआचे आणखी २० आमदार सोबत यायला तयार होते, आता ते मविआत असले, तरी मनाने युतीसोबत आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. सरकार स्थापन झाले आणि या ऑपरेशनमध्ये जबाबदारी पार पाडणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला.

शिंदेंनी भाजपसोबत सुरू असलेल्या उठावाच्या वाटाघाटींची कल्पना दीर्घकाळ स्वत:च्या मुलाला - खा. श्रीकांत शिंदे यांनाही दिली नव्हती. ही गोपनीयता पाळण्याच्या सूचना भाजपनेच शिंदे यांना केल्या होत्या व त्या त्यांनी कसोशीने पाळल्या, असे चव्हाण म्हणाले.

गाडीत कोण हे चालकालाही माहिती नव्हते
ऑपरेशन लोटससंदर्भात संपूर्ण माहिती असलेल्या एक - दोन व्यक्ती होत्या. बाकी अनेकांना केवळ त्यांच्यावरील जबाबदारीची माहिती दिली होती. त्यामुळे आपण एका मोठ्या ऑपरेशनमधील छोटी जबाबदारी पार पाडत आहोत, याची अनेकांना कल्पना नव्हती. सोबत आलेल्या आमदारांना सुरतपर्यंत ते कोणत्या वाहनात बसले आहेत, वाहन कोण चालवतो आहे, याची माहिती नव्हती; तर वाहन चालविणाऱ्याला त्याच्या वाहनात कोण बसले आहे, याची माहिती नव्हती. 
कुणी वेशांतर करून, तर कुणी पोलिसांच्या बंदोबस्तात वसईमार्गे सुरतला गेले. तिकडे गेल्यावर त्या हॉटेलमध्ये 
असलेली कडक सुरक्षा बघितल्यावर अनेक आमदारांना आपण एका मोठ्या बंडातील एक भाग असल्याचे कळले, असे चव्हाण यांनी सांगितले.

सुरतला घेतले कपडे, अंतर्वस्त्रे
सर्व आमदार अंगावरच्या कपड्यानिशी आले होते. सुरतला गेल्यावर अनेकांना आपल्याला दीर्घकाळ घरापासून दूर राहावे लागणार असल्याची कल्पना आली. मग अनेकांनी शर्ट, पॅन्ट, अंतर्वस्त्रे, औषधे मागविली.

...आणि ताण कमी केला
सुरत व गुवाहाटीचा मुक्काम हे एक दिव्य होते. कुणी निघून जाऊ नये, याकरिता एकीकडे सर्वांवर नजर होती. राजकीय घडामोडींमुळे तणाव होता. मात्र, आमदारांनी गाणी गात, पत्ते, कॅरम खेळत व गप्पाटप्पा करीत ताण कमी केला.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: ...At that time, MLAs' mobile phones were taken away, they were not even allowed to watch TV - Minister Ravindra Chavan recalled the memories of the anniversary of the rebellion.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.