अयोध्या पौळ यांनी कल्याण लोकसभेच्या उमेदवार सांगत केले एप्रिल फूल...
By मुरलीधर भवार | Published: April 1, 2024 07:25 PM2024-04-01T19:25:11+5:302024-04-01T19:26:46+5:30
कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
कल्याण: कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. उमेदवारी ही डॉ. श्रीकांत शिंदे यांनाच मिळणार आहे हे गृहित असले तरी समोर महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेचा उमेदवार कोण असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तोपर्यंत उद्वव सेनेच्या सोशल मिडिया समन्वयक असलेल्या अयोध्या पोळ या तरुणीने ट्वीट केले की, तिला उद्धव सेनेकडून कल्याण लोकसभा मतदार संघाची उमेदवारी दिली गेली आहे. मशाल चिन्हावर निवडणूक लढविणार आहे. हे ऐकून कल्याण लोकसभेविषयी पुन्हा चर्चेला उधाण आले. मात्र पोळ यांनी स्वत: सांगितले की, अरे ते एप्रिल फूल होते. त्यामुळे चर्चेचा सगळा धूराळा खाली बसला आहे.
कल्याण लोकसभेचे खासदार शिंदे यांच्या समाेर तगडा उमेदवार देण्यासाठी विविध नावे समोर येत आहेत. उद्धव सेनेकडून सुषमा अंधारे, वरुण सरदेसाई यांच्या नावासोबत केदार दिघे, सुभाष भोईर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या पैकी एकाही नावावर महाविकास आघाडीतील उद्धव सेनेकडून शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून नावांची केवळ चर्चा सुरु आहे. खरे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास २४ एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. तोपर्यंत उद्धव सेनेकडून नाव जाहिर केले जाणार नाही. तोपर्यंत युतीकडूनही वेट अ’ण्ड वा’चची भूमिका अंगिकारली जात आहे. कल्याणमधूनच उभे राहायचेकी अन्य कुठला सुरक्षित मतदार संघ शोधायचा या सगळ्या राजकीय शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.
अशा परिस्थितीत अयोध्या पोळ यांच्या ट्वीटने चांगलाच घोळ उडवून दिला. सगळे हे विसरुन गेले की, आज एप्रिल महिन्याची पहिली तारीख आहे. या दिवशी एप्रिल फूल केले जाते. राजकीय नेत्यांकडून जनतेला आश्वासने देऊन पाच वर्षे एप्रिल फूल केले जात असताना आत्ता एका तरुणीने तिला उमेदवारी मिळाल्याचे ट्वीट करुन जरा मजा घेत एप्रिल फूल केल्यास त्यात कुठे काय बिघडले अशी प्रतिक्रिया सामान्यांतून उमटली तर नवल नको वाटायला.
हे ट्वीट करुन पाेळ मोकळ्या झाल्या. त्यांचे ट्वीट हे सगळयांनी गांभीर्याने घेतले. त्याचे हे ट्वीट पाहन त्यांना २०० पेक्षा जास्त जणांनी फोन केला. पोळ यांनी सांगितले की, उमेदवारी मला दिलेला नाही. या मतदार संघातून ठाकरेंकडून उमेदवार दिला जाणार आहे असे मला म्हणायचे होते. शिवसेनेने पानटपरीवाल्याला मंत्री केले आहे. ठाकरे या नावात ती ताकद आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आज १ एप्रिल आहे. ते एप्रिल फूल होते असे सांगून त्या मोकळ्या झाल्या आहेत.