केडीएमटीच्या बाळासाहेब ठाकरे आगाराची दुरावस्था, मनसे पदाधिकाऱ्याने वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 05:55 PM2021-07-14T17:55:57+5:302021-07-14T17:57:43+5:30
परिवहन उपक्रमाने 2015 साली वसंत व्हॅली येथे बस आगार सुरु केला होता. त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले होते. महापालिकेस जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत 10 एसी बसेस उपलब्ध झाल्या होत्या.
कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिहवन उपक्रमांतर्गत वसंत व्हॅली येथे 2015 साली सुरु करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे आगाराची दुरावस्था झाली आहे. याकडे मनसे माजी परिवहन सदस्य इरफान शेख यांनी लक्ष वेधले आहे.
परिवहन उपक्रमाने 2015 साली वसंत व्हॅली येथे बस आगार सुरु केला होता. त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले होते. महापालिकेस जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत 10 एसी बसेस उपलब्ध झाल्या होत्या. या एसी बसेस वसंत व्हॅली आगारात ठेवण्याची सोय होती. त्या ठिकाणाहून नवी मुंबईला या बसेस सोडण्यात येत होत्या. आज त्याठिकाणी परिवहनच्या अन्य बसेस उभ्या आहेत. पावसामुळे त्याठिकाणी गवत आणि अन्य झुडपे उगवली आहेत. त्यात हे आगार झाकले गेले आहे.
आगाराला प्रवेश द्वार नाही. त्याठिकाणी बस उभ्या आहे. आगाराची पूर्णपणो दुरावस्था झाली आहे. महापालिकेने त्याठिकाणी अन्य भंगार वाहने ठेवली आहे. आगार हे भंगार वाहने ठेवण्यासाठी आहे की, बसेस चालविण्यासाठी, असा सवाल उपस्थित करीत या विषयीची पोस्ट शेख यांनी फेसबूकवर पोस्ट केली आहे. महापालिकेत गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. तरीही बाळासाहेब ठाकरे परिवहन आगाराची दुरावस्था होते. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, याकडे शेख यांनी लक्ष वेधले आहे. परिवहन व्यवस्थापन आणि सत्ताधा:यांच्या अनास्थेविषयी खंत व्यक्त केली आहे. प्रशासनाने या प्रकरणी मौन बाळगले आहे.
दरम्यान शिवसेनेचे उप शहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितले की, शेख यांच्या फेसबूक पोस्टची शिवसेनेने गंभीर दखल घेत प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता कोविड काळात आगाराकडे दुर्लक्ष झाले आहे. मात्र येत्या 8 दिवसात आगाराच्या ठिकाणी वाढलेले गवत आणि झुडपे काढली जातील. तसेच भंगार वाहने ही हटविली जातील.