बदलापूर प्रकरणात आणखी ३ आरोपी फरार; अक्षय शिंदेवर आणखी २ गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 01:56 PM2024-08-26T13:56:32+5:302024-08-26T13:58:24+5:30
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Badlapur School Crime : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं देशभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली. त्यानंतर आता बदलापूर अत्याचार प्रकरणी नराधम अक्षय शिंदेला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी संपल्यानतंर पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला कोर्टासमोर हजर केले होते. तसेच अक्षय शिंदेच्या आरोपांवरील कलमांमध्येही वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणात आता शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनाही पोलिसांनी आरोपी केलेलं आहे. सध्या तिघेही फरार असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायाधीश वी.ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली. न्यायालयीन कोठडी सुनावताना कोर्टाने या प्रकरणात कलमांमध्ये वाढ केली आहे. आरोपी अक्षय शिंदेच्या प्रकरणात कलम ६ आणि २१ वाढवण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी या प्रकरणात शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे. या प्रकरणानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्यासह अन्य तीन जणांना निलंबित करण्यात आलं होतं. तसेच पोलीस निरीक्षकावरही कारवाई करण्यात आली होती.
"आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून कोर्टाला तीन आरोपी हवे आहेत. मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी हे तीन आरोपी कोर्टाला हवे आहेत. कोर्टाने या तिघांनाही आरोपी बनवलं आहे. तसेच अक्षय शिंदेवर मागच्या एफआयआरमध्ये कलम ६ लावण्यात आलं नव्हतं. आमचीही तीच मागणी होती. त्यानुसार पोक्सोनुसार कलम ६ जोडण्यात आलं आहे," अशी माहिती वकिलांनी दिली.
दरम्यान, आरोपी अक्षय शिंदे याला मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार अक्षय शिंदेची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात येणार आहे.