बदलापूरच्या नाल्यामध्ये मेलेल्या डुकरांचा खच
By पंकज पाटील | Published: December 9, 2022 06:27 PM2022-12-09T18:27:17+5:302022-12-09T18:27:59+5:30
डुक्कर कुजल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी
पंकज पाटील, बदलापूर: स्टेशन जवळ असलेल्या मुख्य नाल्याच्या परिसरात अनेक डुक्कर मरून पडल्याची बाब समोर आली आहेत. तर अजूनही काही डुक्कर मृत अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. नेमके एवढ्या मोठ्या प्रमाणात डुक्कर मेले कसे हे अद्यापही कळू शकलेले नाही. नाल्यात हे डुक्कर कुजल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
गेल्या चार ते पाच दिवसापासून बदलापूरच्या मुख्य नाल्यांमध्ये अनेक डुक्कर मृता अवस्थेत पडली आहेत. तब्बल 15 ते 20 डुक्कर एकाच वेळी मरून पडल्याने या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. स्टेशन परिसरातील बस डेपोला लागूनच असलेल्या या मुख्य नाल्यात मोठ्या प्रमाणात डुक्करचा वावर होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही डुक्कर या नाल्यातच मृत अवस्थेत पडून राहिली आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात डुक्करांचाचा मृत्यू होत असल्याने नेमका त्यांच्यावर विष प्रयोग करण्यात आला आहे की नाल्यातील विषारी द्रव्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
आता या मृत डुकरांची योग्य विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनामार्फत सुरू असली तरी याच परिसरातील इतर काही डुक्कर अजूनही मृत अवस्थेत दिसत आहेत. त्यामुळे या डुकरांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.