अक्षय शिंदेचे आई-वडील म्हणतात, पाेलिस संरक्षण द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 06:25 AM2024-09-27T06:25:12+5:302024-09-27T06:25:54+5:30
मृतदेह दफन करण्यासाठी सुरक्षित जागा द्या
कल्याण :बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणातील पोलिस चकमकीत ठार झालेला आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून द्यावी तसेच आम्हाला पोलिस संरक्षण पुरविण्यात यावे, या मागण्यांसाठी त्याच्या आई-वडिलांनी गुरुवारी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
अक्षयचे नातेवाईक अमर शिंदे यांनी सांगितले की, अक्षयचा खटला लढविणारे वकील आणि त्याच्या आई-वडिलांच्या जीवितास धोका आहे. पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार होऊ शकतात.
ठाणे, कळव्यात नको...
अक्षयच्या मृतदेहावर बदलापूर, अंबरनाथ आणि ठाण्यामध्ये अंत्यसंस्कार करण्यास मनसेने विरोध दर्शविला आहे. मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी पोलिसांना तसे पत्रही दिले असून, मृतदेह त्याच्या गावीच पुरण्यात यावा, असे त्यात नमूद केले आहे.